Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar Mid Night Protest: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी विधानभवनामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीवरुन वातावरण तापलेलं असतानाच विधानभवनामध्ये मध्यरात्रीनंतरही अटक नाट्यावरुन चांगलाच राडा झाला. जितेंद्र आव्हाड यांनी ज्या कार्यकर्त्याला मारहाण झाली त्यालाच पोलीस अटक करत असल्याचा दावा करत पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन केलं. आव्हाड यांनी कार्यकर्त्याला सोडेपर्यंत आपण हटणार नाही अशी भूमिका घेतली. अखेर आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना डावलून नितीन देशमुख यांना ऐनवेळी दुसऱ्या गाडीमधून पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. पोलिस आणि आव्हाड यांच्यातील या संघर्षादरम्यान पोलिसांनी आव्हाड यांना खेचून बाजूला काढावं लागलं.
सायंकाळच्या सुमारास विधानभवनाच्या प्रवेशद्वारानंतर इमारतीत प्रवेश केल्यानंतरच्या लॉबीमध्ये आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला पडळकरांच्या पाच कार्यकर्त्यांनी मारहाण केली. ही दृष्य कॅमेरांमध्ये कैद झाली. या मारहाणीनंतर दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाले. या प्रकरणानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र आव्हाड यांनी केलेल्या दाव्यानुसार, मारहाण करणाऱ्या पडळकरांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनीच तंबाखू मळून दिली. वडापाव आणून दिला. प्रसारमाध्यमांसमोर बोलताना आव्हाड यांनी पोलीस निरिक्षक चव्हाण यानेच आरोपींना वडपाव आणि तंबाखू दिल्याचा दावा करताना या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली.
मारहाण प्रकरणानंतर आपल्याला विधानसभा अध्यक्षांनी ताब्यात असलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस सोडून देतील असं सांगण्यात आल्याचं आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांना पोलिसांच्या गाडीसमोर आंदोलन करताना सांगितलं. आव्हाड यांनी ज्यांनी मार खाल्ला त्यालाच घेऊन जात आहेत असा आरोप केला. तुमच्या कार्यकर्त्यांना सोडून देऊ असं सांगितल्यानंतरही त्यांना का घेऊन जात आहेत? असा सवाल विचारत आव्हाड यांनी या कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी केली.
"पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख याला विधानभवनात मारहाण केली. यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले. शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं. विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे," असं म्हणत आव्हाड यांनी रात्री 12 वाजून 37 मिनिटांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आव्हाड कार्यकर्त्याला घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीसमोर इतर कार्यकर्त्यांसमोर बसून घोषणाबाजी करत असल्याचं दिसत आहे. या पोस्टमध्ये पुढे आव्हाड यांनी, "मार खाणार आमचा कार्यकर्ता, पळून जाणार पडळकरचे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर," असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. "सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं! या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही," अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. तसेच पोस्टच्या शेवटी आव्हाड यांनी, "मी इतकच सांगतो, माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही," असंही म्हटलं.
पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 17, 2025
म्हणजे मार… pic.twitter.com/U3Jfnuyzm9
एकीकडे आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते पोलिसांनी नितीन देशमुखला बसवलेल्या कारसमोर आंदोलन करत असतानाच अचानक त्याला दुसऱ्या कारमध्ये बसवलं. या गोंधळादरम्यान आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते या दुसऱ्या गाडीसमोर आंदोलन करण्यासाठी उठले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आव्हाड दुसऱ्या गाडीच्या पुढील बाजूस आव्हाड यांनी स्वत:ला झोकून दिलं. आव्हाड ही कार इंचभरही हलू देणार नाही अशा भूमिकेत थेट कारच्या खाली घुसले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना हातपायाला खेचून बाजूला केलं आणि पोलिसांची गाडी मार्गस्थ झाली. या प्रकरणावरुन आजही राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.