Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कोल्हापुरात बालगुन्हेगारी वाढली, गेल्या वर्षभरात 240 अल्पवयीन गुन्हेगारांची नोंद

एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल 240 बाल गुन्हेगारांची नोंद झाली आहे. बलात्कार आणि विनयभंग अशा गुन्ह्यांमध्ये 39 अल्पवयीन गुन्हेगार सापडलेत. त्यामुळे पोलिसांबरोबरच पालकांची डोकेदुखी वाढली आहे. 

कोल्हापुरात बालगुन्हेगारी वाढली, गेल्या वर्षभरात 240 अल्पवयीन गुन्हेगारांची नोंद

प्रताप नाईक, (प्रतिनिधी) कोल्हापूर: वाढती गुन्हेगारी कायमच चिंतेचा विषय असते. आता अल्पवयीन गुन्हेगारांमुळे चिंतेत भर पडलीय. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल 240 बाल गुन्हेगारांची नोंद झाली आहे. बलात्कार आणि विनयभंग अशा गुन्ह्यांमध्ये 39 अल्पवयीन गुन्हेगार सापडलेत. त्यामुळे पोलिसांबरोबरच पालकांची डोकेदुखी वाढली आहे. 

अलिकडच्या काळात जगामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. पण यात धक्कादायक बाब आहे ती अल्पवयीनही गुन्हेगारीकडे वळत आहेत. आपल्याराज्यात एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 2024 वर्षात, तब्बल 240 अल्पवयीन गुन्हेगारांची नोंद झाली आहे. यामुळे पोलिसांसह पालकांची डोकेदुखी वाढलीये. पण अल्पवयीन गुन्हेगारीकडे का बरं वळू लागलेत? याची कारणं शोधली पाहिजेत.

कोल्हापुरात हत्या, मारहाण, बलात्कार, विनयभंग, खंडणी, चोरी अशा घटनांमध्ये  बाल गुन्हेगारांचा समावेश आहे. समाजमाध्यमांवर गुन्हेगारांच्या समर्थन करणा-या व्हिडिओजवर अल्पवयीन मुलांच्या लाईक्स आणि कमेंट्स असतात. त्यातून बाल गुन्हेगाराची मानसिकता कशी बदलली आहे, हे दिसून येतंय. 

आपली मुलं ही आपलीच जबाबदारी असते. त्यामुळे तुम्ही कितीही नोकरीव्यवसाय या कामात व्यग्र असलात तरी मुलावर लक्ष ठेवणं, हे महत्त्वाचं आहे. मुलांना काही नियम घालून द्या, त्यांच्यावर जबाबदा-या सोपवा यातून मूल सक्षम बनेल, त्या जबाबदा-या कशा पार पाडल्या यातून तुम्ही त्याला अधिक ओळखू शकता, कळीचा मुद्दा मोबाईल कधी आणि किती वापरावा हे ठरवून द्या, सर्वंच पासवर्ड मुलांना देऊ नका, असं तज्ज्ञ सांगतात. आता पालक म्हणून मुलांचे मित्र व्हा, त्यांच्याशी मोकळेपणाने बोला, त्यांच्या अडचणी समजून घ्या, कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी मुलानं तुम्हाला सांगितलं पाहिजे, हा विश्वास निर्माण करा. जेणेकरून तो जे करतोय ते योग्य की अयोग्य हे तुम्ही त्याला सांगू शकाल. बाल गुन्हेगारीला कारणं अनेक असतील. पण पालकांनी काही छोट्या गोष्टी केल्या तर भविष्यातला मोठा धोका नक्कीच कमी होऊ शकतो. 

Read More