Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्र हादरला! ठाण्याजवळ कामाला निघालेल्या महिलेची भर दिवसा भर रस्त्यात हत्या

ठाण्याजवळ कळवा परिसरात एका महिलेची हत्या झाली आहे. 

महाराष्ट्र हादरला! ठाण्याजवळ कामाला निघालेल्या महिलेची भर दिवसा भर रस्त्यात हत्या

Thane kalwa Crime News : महिलांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी भायनक घटना ठाण्याजवळ घडली आहे. कामाला निघालेल्या महिलेची भर दिवसा भर रस्त्यात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ठाण्याजवळ घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या महिलांमध्ये दहशत पसरली आहे. 

कळवा पूर्वेतील सम्राट अशोक नगर परिसरात ही घटना घडली आहे. सकाळच्या वेळेस कामावर निघालेल्या एका महिला मजुराची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शांती सुरेश चव्हाण (वय अंदाजे ३७ वर्षे) या महिलेला अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे ठार मारले. या घटनेमुळे संपूर्ण कळवा परिसरात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरले आहे.
सकाळच्या सुमारास शांती चव्हाण या घरातून नेहमीप्रमाणे मजुरीसाठी बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्या कामावर पोहोचल्या नाहीत. दुपारी त्यांचा मृतदेह कळवा येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आढळून आला.. त्यांच्या गळ्यात ओढणी आवळलेली होती आणि मानेवर व पोटावर धारदार शस्त्राने केलेले गंभीर वार स्पष्टपणे दिसून येत होते. या घटनेवरून हा पूर्वनियोजित खून असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, शांती चव्हाण यांची हत्या झाल्याची बातमी पसरताच कळवा नाका परिसरातील महिला नाका कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
शांती चव्हाण यांना न्याय मिळावा यासाठी मोठ्या संख्येने महिला कामगार कळवा रुग्णालयात जमल्या. 

पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, शक्य त्या सर्व दिशांनी तपासाची चक्रे फिरवली जात आहेत. शांती चव्हाण यांची कोणाशी वैयक्तिक वैर होती का? हेही तपासलं जात आहे. "महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कामावर जाणाऱ्या महिलांना पुरेशा सुरक्षा सुविधा मिळणे ही काळाची गरज आहे," असे मत स्थानिक महिलांनी व्यक्त केले आहे. या घटनेने संपूर्ण कळवा हादरले असून, पोलिसांकडून लवकरात लवकर आरोपीला अटक करून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Read More