Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

12 हजारात घर कसं चालणार? कुटुंबीयांचा अपेक्षाभंग झाल्याची खंत; नवी मुंबईत तरुणीने स्वतःला संपवलं


Navi Mumbai Crime News: 12 हजारात घर कसं चालणार, आर्थिक विवंचनेतून तरुणीने उचललं टोकाचे पाऊल 

12 हजारात घर कसं चालणार? कुटुंबीयांचा अपेक्षाभंग झाल्याची खंत; नवी मुंबईत तरुणीने स्वतःला संपवलं

Navi Mumbai Crime News: कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी नोकरीनिमित्ताने मुंबईला आलेल्या तरुणीने मोठं पाऊल उचललं आहे. तरुणीचा अपेक्षाभंग झाला आणि तिने आत्महत्या करत जीवन संपवले आहे. 22 वर्षीय तरुणी मुळची कानपूरची असून ती ऐरोलीत पेईंग गेस्ट म्हणून राहायची. 12 हजार पगारात घरभाडे, घरखर्च तसेच आई वडिलांच्या गरजा भागवणे शक्य होत नसल्याची खंत तिने डायरीत लिहून ठेवली आहे. या अपेक्षांच्या ओझ्यामुळंच तिने आत्महत्या केली आहे. 

नंदिनी तिवारी (२२) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती मूळची कानपूरची आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ती बारावीचे शिक्षण पूर्ण करून कुटुंबाचा आधार बनण्यासाठी मुंबईला आली होती. त्यानुसार काही महिन्यांपासून ती एका कंपनीत 12 हजाराची नोकरी करत होती. तर ऐरोली सेक्टर 1 येथे इतर तीन मुलींसोबत पेईंगगेस्ट म्हणून रहायची. तिच्या तिनही सहकारी गावी गेल्याने काही दिवसांपासून ती घरी एकटीच होती. तिच्या मनमिळावू स्वभावामुळे शेजाऱ्यांसोबत तिची चांगलीच गट्टी जमली होती. यामुळे शनिवारपासून ती कोणाला भेटली नसल्याने व घराचा दरवाजा आतून बंद असल्याने शेजाऱ्यांनी रविवारी दुपारी बनावट चावीने घराचा दरवाजा उघडला.

यावेळी हॉलमध्ये तिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवताच रबाळे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून रुग्णालयात पाठवला. घरात पाहणीदरम्यान तिची डायरी मिळून आली आहे. त्यात मिळणार पगार व गरजा यांची सांगड जमत नसल्याची खंत तिने लिहिली असल्याचे महिला सहायक पोलिस निरीक्षक वृषाली पवार यांनी सांगितले. याच आर्थिक अडचणीमुळे नैराश्य आल्याने पुन्हा कानपूरला जाणार असल्याचेही तिने मैत्रिणीकडे बोलून दाखवले होते. यावरून आर्थिक अडचण, अपेक्षा भंग यातून तिने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read More