Khambatki Tunnel Pune Bengaluru Expressway : पुण्यापून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाटाशिवाय पर्याय नाही. याच खंबाटकी घाटात इंग्रजीतील 'S' आकाराचे धोकादायक वळण आहे. या वळणावर प्रवास करताना अनेक प्रवाशांचा बळी गेला आहे. मात्र, पुण्याहून साताराला जाताना खंबाटकी घाट लागणार नाही. या घाटात नवा बोगदा बांधण्यात येत आहे.
खंबाटकी घाटात नेहमीच वाहतुक कोंडी होते. यामुळे प्रवासाला विलंब होतो. येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नविन बोगदा बांधण्यात येत आहे. या बोगद्यामुळे महामार्गावरील प्रवास अतिशय सुपरफास्ट होणार आहे. तसेच डेंजर घाटही लागणार नाही. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे.
पुणे बंगळूर महामार्गावरुन प्रवास करताना खंबाटकी घाट हा वाहतुकीचा एक महत्वाचा टप्पा आहे. या मार्गावरील दळणवळण व वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळेच खंबाटकी घाटातील प्रवास अधिक गतीने आणि सुरक्षित होण्यासाठी काही वर्षांपूर्वी या घाटवाटेचा मार्ग हा पुण्याहून साताऱ्याकडे जाण्यासाठी एकेरी करण्यात आला. तर साताऱ्याहून येण्यासाठी बोगदा तयार करत स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला. या स्वतंत्र व्यवस्थेमुळे गेली काही वर्षे वाहतूक सुरळीत आणि गतीमान राहिली. मात्र गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहनांमध्ये वाढ झाल्यानंतर हा एकेरी मार्ग आणि बोगदा मार्ग अपुरा पडू लागला.
सध्या पुण्याहून साताऱ्याकडे जाणारा मार्ग हा घाटवाटेचा आहे. हे आठ किमी अंतर पार करण्यास 35 ते 40 मिनिटांचा वेळ लागतो. अपघात झाल्यास किंवा एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीमुळे घाटवाटेतील वाहतूक ठप्प होते.
पुण्याकडे येण्यासाठी जो बोगदा तयार केला आहे. त्यातून येण्यासाठी फक्त 15 मिनिटांचा वेळ लागतो. या मार्गावरील वाहनांची संख्या वाढल्याने येथे वाहतूक कोंडीसह अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच येथे नविन बोगदा तयार केला जात आहे.
खंबाटकीच्या नवीन बोगदयासाठी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वेळे गावापासून वाण्याचीवाडी ते खंडाळा दरम्यान 6.3 किलोमीटर लांबीचा नवीन सहापदरी रस्ता बांधला जात आहे. यामध्ये दोन स्वतंत्र बोगदयांचे नियोजन आहे. हे दोन्ही बोगदे 16 मीटर रुंद व सुमारे 9.31 मीटर उंच असणार आहेत. या बोगदयांमध्ये तीन लेनचे रस्ते असणार आहेत. या बोगदयातून रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्गही असणार आहे.
अत्याधुनिक सर्व यंत्रणांसह हा बोगदा तयार होत आहे. बोगदा रस्त्यावर आपत्तकालीन रस्ताही बनवला जात आहे. त्याचा उपयोग अपघात प्रसंगी वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार आहे.
खंबाटकी घाटातील या नव्या बोगद्यामुळे पुण्याहून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाट लागाणार नाही. 'S' आकाराचे वळण देखील लागणार नाही. यामुळे या बोगद्यामुळे प्रवास सुपरफास्ट आणि जलद होणार आहे.