Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

Baba Maharaj Satarkar Death: ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. उद्या संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर नेरुळमध्ये अत्यंसंस्कार होणार आहेत.

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

Baba Maharaj Satarkar Death: ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. उद्या संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर नेरुळमध्ये अत्यंसंस्कार होणार आहेत. बाबामहाराज सातारकर यांचं खरं नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं होतं. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातार्‍यामध्ये झाला होता. बाबामहाराज सातारकरांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्तम मृदूंग वाजवायचे. बाबामहाराजांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांनाही संत वाङ्मयाची विशेष आवड होती. 

किर्तनाची मोठी परंपरा

बाबामहाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले.  पुढे त्यांनी पदवीपर्यंतचे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून बाबामहाराजच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जाते. त्यांच्या कुळामध्ये 135 वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. घराण्यात गेल्या 3 पिढ्यांपासून कीर्तनाची तसेच प्रवचनाची परंपरा बाबामहाराजांनी पुढे सुरु ठेवली. बाबामहाराज सातारकर  परमार्थाचे धडे गिरवण्यासाठी त्यांनी चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांचे शिष्य झाले. वयाच्या 8 व्या वर्षांपासून बाबामहाराज सातारकर श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. वयाच्या 11 व्या वर्षांपासून बाबामहाराज सातारकर यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली.

मानकरी म्हणून परंपरा

1950 ते 1954 या काळावधीमध्ये बाबामहाराजांनी फर्निचरचा व्यवसाय केला होता. मात्र पुढे परमार्थामध्ये स्वत:ला वाहून घेण्याचा निश्चय करीत बाबामहाराजांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे 150 वर्ष परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबामहाराज यांच्याकडे 80 वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी होण्याची परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे 100 वर्षे राखली.

60 ते 70 हजार भाविकांची मोफत सेवा

आप्पामहाराज देहावसानानंतर 1962 सालापासून त्यांची परंपरा बाबामहाराजांनी पुढे चालू ठेवली. समाजप्रबोधनचं कार्य म्हणून डिसेंबर 1983 पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा बाबामहाराजांनी सुरू केली. पैठण, पंढरपूर, पिंपळनेर, भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे आदी ठिकाणी बबामहाराजांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केलं होतं. बाबामहाराजांनी सुमारे 15 लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दिक्षा देत व्यसनमुक्त केले. 1983 साली त्यांनी जनसेवेसाठी 'श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था' स्थापना केली. 60 ते 70 हजार भाविकांना या संस्थेमार्फत विनामूल्य वैद्यकीय सेवा आणि औषधं पुरवली जातात.

Read More