Only Snake School In Maharashtra: साप म्हटल्यानंतर आपल्यापैकी अनेकांची गाळण उडते. खरं तर सर्व साप विषारी नसतात. भारतात तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच सापाच्या जाती विषारी आहेत. मात्र या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात एवढी भिती बसली आहे की अनेक ठिकाणी गावांमध्ये घराच्या आजूबाजूला साप दिसला की तो मारुन टाकलेला बरा अशी विचारसणी दिसून येते. मात्र एकीकडे बऱ्याच गावांमध्ये हा असा प्रकार दिसत नसताना दुसरीकडे महाराष्ट्रात असंही एक गाव आहे जिथे चक्क सापांची शाळा आहे. हे गावं कोणतं आणि या गावातील शाळेत सापांना अगदी हातात घेऊन विद्यार्थी का वावरत असतात जाणून घेऊयात...
ज्या शाळेबद्दल आपण बोलतोय किंवा जिला 'महाराष्ट्रातील एकमेव सापांची शाळा' म्हणून ओळखलं जातं ती शाळा कोल्हापूरमध्ये आहे. चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालय असं या शाळेचं नाव आहे. 1966 पासून ही शाळा सापांसंदर्भातील कामासाठी चर्चेत आहे. बाबूराव टकेकर नावाच्या सर्पमित्राने सापांबद्दल लोकांना ज्ञान मिळावं या हेतूने या शाळेशी संलग्न असं स्पर्पोद्द्यान सुरु केलं. अज्ञानामुळे लोकांनी आणि सापांनीही प्राण गमवून नये असा प्रांजळ हेतू मनात ठेऊन बाबूराव यांनी शाळा प्रशासनाच्या मदतीने शाळेजवळच छोटसं सर्पोद्द्यामध्ये सापांचं संगोपन करण्यास आणि त्यांच्याबद्दल जनजागृती करण्यास सुरुवात केली.
या शाळेतील जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला सापांबद्दलचं ज्ञान आहे. येथील जवळपास सर्वच विद्यार्थी सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती ओळखू शकतात आणि सावधपणे ते साप पकडूही शकतात. साप विषारी आहे की बिनविषारी आहे याचं ज्ञानही या विद्यार्थांना आहे. साप विषारी आहे ही बिनविषारी हे कसं ओळखावं हे सुद्धा या विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्येच शिकवलं जातं. अनेकदा या शाळेला भेट देणाऱ्यांना विद्यार्थी अगदी सहज आणि न घाबरता साप हाताळताना दिसतात. समोरचं चित्र पाहून पाहुणे नक्कीच थक्क झाल्याशिवाय राहत नाहीत. तुम्हीच पाहा या अनोख्या शाळेचा व्हिडीओ...
आज या शाळेत 70 प्रजातीचे साप असून येथील विद्यार्थी हे साप सहज हाताळतात. त्यामुळेच येथे शिकणारी मुलं ही केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन बाहेर पडत नाही तर ते सर्पमित्र बनूनच शाळेतून बाहेर पडतात.