मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या विडंबनात्मक गाणं करणाऱ्या कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या आहेत. कामरासोबत या गाण्याचं समर्थन करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याही अडचणीत वाढ झालीय. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत दाखल हक्कभंग प्रस्ताव विशेषाधिकार समितीने स्वीकारलाय.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एक विडंबनात्मक गाणं सादर करत नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली होती. त्या गाण्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कामराची पाठराखण केली होती. मात्र आता कामरा आणि अंधारे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कामरा आणि अंधारे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला हक्कभंग विशेषाधिकार समितीने स्वीकारला समितीने या दोघांना स्पष्टीकरण देण्यासाठी 2 दिवसांची मुदत दिली आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे स्वप्नात सुद्धा हनुमानाची पूजा करत नाहीत; हनुमान आहे इथल्या लोकांचा दुश्मन!
माझं कुणाल कामराशी बोलणं झालं. आपण कायद्याला सामोरे जायला हवं असं मी कुणालला सांगितल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तर तारतम्य न बाळगता बेफाम वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई नक्कीच होईल अशी प्रतिक्रीया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.
विधीमंडळात जर हक्कभंग आणला गेला तर सभागृहाबाहेरील व्यक्ती असल्यास समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणात आता काय निर्णय दिला जातो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कुणालला हायकोर्टाने दिलासा दिला असला तरी तो विधीमंडळाच्या कायद्याच्या कचाट्यात सापडलाय.