Pune Kundmala Indrayani River Bridge Collapse News : पुण्यlत मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्यातील इंद्रायणी नदीजवळील पूल कोसळला. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 ते 30 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जातेय. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या कुंडमळ्याच्या या पुलावर विकेंडनिमित्त पर्यटकांनी गर्दी केली होती. मात्र हा पूल जीर्ण झाला होता. यावेळी पूलावर पर्यटकांची गर्दी वाढल्याने पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. यात काही पर्यटक जखमी झाल्याचं समजतंय. घटनास्थळी 18 ते 20 रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. तसंच NDRFच पथकही पोहोचलं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. 40 पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे असे अवाहन राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे . मात्र ही घटना का घडली याचा शोध घेतला असता, कुंडमळा परिसरातील इंद्रायणीवरचा पूल किंवा एकूणच राज्यातील वेगवेगळ्या नद्यांवर असणारे पूल यांच्या संबंधाने आवश्यक असणारी कामे पावसाळ्याआधी होणे अधिक गरजेचे आहे. अशा मोडकळीस आलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणे गरजेचे आहे. मात्र या पुलाच्या बाबतीत अशी कुठलीही खबरदारी घेतलेली नव्हती. वारंवार ग्रामस्थांनी नवीन पुलाची मागणी केलेली असताना आणि पर्यायी रस्ता उपलब्ध नसताना सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधीनी या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले त्यामुळे या दुर्घटनेत गेलेले बळी हे नैसर्गिक बळी नाहीत तर शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे बळी आहेत अशी पोस्ट शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी दिली.