Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कडाक्याच्या थंडीमुळे उसतोड मजुराच्या चिमुकलीचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातल्या थंडीच्या कडाक्यानं एका चिमुकलीचा बळी घेतला आहे.

कडाक्याच्या थंडीमुळे उसतोड मजुराच्या चिमुकलीचा मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातल्या थंडीच्या कडाक्यानं एका चिमुकलीचा बळी घेतला आहे. बाळू नामनौर या ऊसतोड मजुराची अवघ्या तीन महिनायांची ही मुलगी आहे. रेणापूर तालुक्यातल्या खलंग्री शिवारातली ही घटना आहे. 

कुटुंबासहित खलंग्री परिसरात मुक्काम

मूळचे यवतमाळ जिल्ह्यामधल्या पुसद तालुक्यातल्या आमटी गावचे बाळू नामनौर हे रहिवासी आहेत. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शुगर्स कारखान्याचा ऊस तोडण्यासाठी, बाळू नामनौर आपल्या कुटुंबासहित खलंग्री परिसरात गेल्या काही दिवसांपासून काम करत आहेत. 

थंडीचा कडाका वाढला

ऊसाच्या शेताच्या परिसरातच राहुट्या टाकून नामनौर कुटुंब राहत होतं. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून या ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. त्यातच बाळू नामनौर यांच्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा थंडीमुळे गारठून मृत्यू झाला. 

थंडीपासून बचाव करण्याइतपतही गरम कपडे नव्हते

गंभीर बाब म्हणजे झोपडीसारख्या राहुटीत राहणा-या नामनैर कुटुंबाकडे थंडीपासून बचाव करण्याइतपतही गरम कपडे नव्हते. त्यामुळेच या चिमुकलीचा मृत्य झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या कुटुंबाला थंडीमुळे पोटची मुलगी गमवावी लागली आहे.
 
खलंग्री परिसरात हळहळ व्यक्त

दुर्दैव म्हणजे महाशक्ती होण्याच्या दिशेनं वाटचाल करणारा भारत, आपल्या प्रजासत्ताक दिनाचा 69वा वर्धापन दिन साजरा करत असतानाच्या दिवशीच ही घटना घडली आहे. त्यामुळे खलंग्री परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Read More