Ladki Bahin: लाडकी बहिणींच्या पाठिशी खंबीरपणे असल्याचा दावा महायुती सरकारकडून सातत्यानं केला जातोय. त्याचाच भाग म्हणून लाडक्या बहिणींना सध्या दिली जाणारी 1500 रुपयांची रक्कम 2100 रुपये करण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं. मात्र आता लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम मिळण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींचं 1500 रुपयांचं अनुदान वाढवून 2100 रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. महायुती सरकार निवडून आल्यानंतर 2100 रुपये अनुदान कधी होणार याची उत्सुकता लाभार्थी महिलांमध्ये होती. त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपयांचा निर्णय घेण्याची ग्वाही सरकारनं दिली होती. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालंयं. 10 मार्चला अजितदादा बजेट मांडणार आहेत. या बजेटमध्ये 2100 रुपयांची मोठी घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लाडकी बहीण ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. योजनेचे लाभार्थी दोन कोटींच्या घरात असल्यानं त्यासाठी भरघोस तरतूद करावी लागणार आहे. पण अधिवेशनात 2100 रुपये अनुदान करण्याबाबत सरकारी पातळीवर कोणतीही हालचाल दिसत नाही. सरकारनं 2100 रुपयांची घोषणा केली होती ते पैसे कधी मिळणार असा सवाल एकनाथ खडसेंनी केलाय.लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. जागतिक महिला दिनी फेब्रुवारी मार्च महिन्याचे दोन हप्ते जमा होणार असल्याची खुशखूबर महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेंनी दिलीय.
लाडकी बहीण योजनेत पडताळणी सुरु झालीये. त्यामुळं यावेळी ज्या बहिणींना पैसे जमा झाल्याचा मॅसेज येणार नाही त्यांचं नाव योजनेतून वगळलं गेल्याची शक्यता आहे. त्यामुळं महिलादिनी येणाऱ्या मॅसेजकडं कोट्यवधी महिलांचे डोळे लागलेत.