Ladki Bahin May Month Installation: महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येतेय. राज्यातील लाडकी बहीण योजनेला पात्र महिलांना मे महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेंनी यासंदर्भात माहिती दिली.
लाडक्या बहिणींसाठीच्या निधीसाठी सरकारची दमछाक होताना दिसतेय.. कारण लाडक्या बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीला पुन्हा कात्री लावण्यात आलीय. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आलाय. अनुसुचित जाती घटकांसाठीचा 410. 30 कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवण्यात आलाय. आतापर्यंत इतर विभागांचा 1 हजार 156.3 कोटींचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वळवलाय. लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यासाठी सरकारकडून इतर विभागांच्या निधीला कात्री लावण्यात येतेय.
माझ्या खात्याचे पैसे लाडकी बहीणसाठी वर्ग करण्यात आले. पूर्वीदेखील 7 हजार कोटी वर्ग करण्यात आले होते. याची मला पुसटशी कल्पना नसल्याचे धक्कादायक विधान मंत्री संजय शिरसाठी यांनी केलंय. या खात्याची आवश्यकता नसेल तर हे खाते बंद करा. दलित मागासवर्गीय काय करायचं बघू अशा शब्दात त्यांनी नाराजीदेखील व्यक्त केलीय. याला अन्याय म्हणा, कट म्हणा, असे का करताय कळत नाही. फायनान्स विभाग मनमानी करतंय. सहन करण्याची मर्यादा आहे. सगळं कट करून टाका. कशाला हवी शिष्यवृत्ती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. या खात्याचा निधी वर्ग करता येत नाही. कट करता येत नाही. फायनान्स वाले जास्त डोके चालवत असेल तर हे आम्हाला मान्य नसल्याचे संजय शिरसाट म्हणाले होते. मला हे पटलेलं नसून मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलेन. माझ्या खात्यावर याचा निश्चित परिणाम होईल. एक दिवस अशी गळती लागेल की काम होणार नाही, असेही ते म्हणाले.
लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर 1.20 लाख महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिण योजनेला लाभ घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने 1 लाख 60 हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिला. सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदविलेली होती. त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात 2652 महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले. त्यांनी ऑगस्ट 2024 पासून एप्रिलपर्यंत म्हणजे 9 महिन्यांत प्रत्येकी 13 हजार 500 रुपये घेतले. याचा अर्थ 3 कोटी 58 लाखांची कमाई त्यांनी केली असल्याचे समोर आले आहे.ज्या 2,652 महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा गैरफायदा घेतला त्यांच्याकडून आता या रकमेची म्हणजेच 3 कोटी 51 लाख रुपयांची वसुली करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाला त्या बाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते. तरीही महिला कर्मचाऱ्यांनी अर्ज भरले तसंच योजनेचा लाभही घेतला आहे. यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.