Mumbai Pune Expressway : मुंबई आणि पुणे... महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरं आणि या शहरांना जोडणारा, प्रवास आणखी सुकर करणारा मार्ग म्हणजे मुंबई- पुणे एक्स्प्रेसवे. प्रचंड वेगानं जगणाऱ्या मुंबई शहरातून निघणारी एक अशी वाट जी निसर्गाची विविध रुपं दाखवत पुण्यापर्यंत नेऊन सोडते. नवी मुंबईटच्या पुढे या मार्गानं जात असताना नजरेस अनेक डोंगररांगा येतात, वळणवाटा येतात आणि एका ठराविक उंचीवर गेल्यानंतर तिथून मागे किंवा खाली पाहताना प्रत्येकवेळी भारावल्याचीच भावना मनात घर करून जाते.
अशा या मुंबई- पुणे प्रवासात आता हीच जुनी वाट एका नव्या रुपात, एका नव्या बदलासह वाटसरुंसाठी सज्ज होणार आहे. कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आता आठ पदरी होणार आहे. सध्याच्या घडीला एक्स्प्रेस वेवर प्रवासासाठी जाण्याच्या दिशेनं तीन आणि येण्यासाठी तीन अशा एकूण सहा मार्गिका आहेत. असं असूनही सकाळी आणि रात्री, आठवडा अखेरीस आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याच परिस्थितीचा आढावा घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं (एमएसआरडीसी) ही वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी दोन्ही बाजूंनी एक-एक लेन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचा रितसर प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला असून, या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास आणि वेळेत कामं सुरू होऊन ती पूर्ण झाल्यास भविष्यात एक्स्प्रेस वेवरून केला जाणार प्रवास आणखी वेगवान होण्याची शक्यता आहे.
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरून सध्याच्या घडीला दर दिवशी 50 ते 60 हजार वाहनं प्रवास करत असून, आता त्यात घाट क्षेत्रामध्ये 13 किमी लांबीचा मिसिंग लिंक उभारला जाणार असल्यानं हा भाग आठ पदरी असल्यामुळं थेट आता संपूर्ण एक्स्प्रेस वे आठ पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास एकूण 94 किमीच्या एक्स्प्रेस वे वर 13 किमीचा मिसिंग लिंक वगळल्यास उर्वरित 75 किमीचा महामार्ग 8 पदरी केला जाईल. या नव्या मार्गिकांमुळं मुंबईतून पुण्याच्या दिशेनं जाणारा अमृतांजन पुलापाशी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार आहे. तेव्हा आता या प्रस्तावाला मंजुरी मिळून हे काम प्रत्यक्षात केव्हा सुरू होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.