Latur News: लातूरच्या अहमदपूर तालुक्यातून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नसल्याने एक वृद्ध शेतकरी चक्क स्वतःच औत ओढत आपल्या शेतीची मशागत करताना दिसत आहे. हाडोळती येथील अल्पभूधारक शेतकरी मागच्या 50 वर्षापासून शेतीत करत आहे. मात्र, त्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याला शेतात ट्रॅक्टरने किंवा बैलाने शेतीची मशागत करणे अवघड झालं आहे.
त्यामुळे हे पवार दाम्पत्य आपल्या शेतीत कोळपणीचं काम करत आहेत. दरम्यान, या वृद्ध शेतकरी दाम्पत्याचं वय 75 वर्ष आहे. मात्र, हे दोघेही पती-पत्नी दिवस-रात्र आपल्या शेतात राबत असतात. शेतात इतकं कष्ट करून देखील शेती परवडत नाही. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी देखील मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना मदत आणि कर्जमाफीची मागणी
सध्या सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार वाढला आहे. त्यामुळे शेतामधील काम करण्यासाठी आम्हाला ट्रॅक्टर लावणे परवडत नाही. त्यामुळे आम्ही दोघं नवरा-बायको रोज शेतात राबतो. यामधूनच आम्ही आमचा संसार भागवतो. तर शेती पाच एकर असून आम्ही स्वत: शेतात काम करतो. बैल लावणे आणि ट्रॅक्टर लावणे आम्हाला परवडत नाही. पैसे देखील नाहीत.त्यामुळे राज्य सरकारने आमचं कष्ट पाहून आम्हाला मदत करावी आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशा मागणी यावेळी शेतकरी दाम्पत्यांनी केली आहे.
राज्यभरातील पेरण्याची स्थिती ?
राज्यभरात अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस नसल्यामुळे आणि काही ठिकाणी अति पावसामुळे खरीप पेरण्या रखडल्या आहेत. कुठे मुसळधार पावसामुळे शेतात चिखल झाला आहे. विदर्भात पुरेसा पाऊस पडला नसल्याने त्याठिकाणी खरीप पेरण्या अद्याप झालेल्या नाहीत. राज्यात यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला. यामुळे अनेक ठिकाणी शेतीला पाणी लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 25 जूनच्या अखेरीस राज्यात 39 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्यामध्ये पुणे विभागातील अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूरमध्ये 51 टक्के आणि अमरावती विभागातील पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी 42 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. संभाजीनगरमध्ये 37 टक्के तर नाशिक विभागात 39 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वात जास्त 58 ट्क्के पेरण्या या लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोलीत झाल्या आहेत.