Laxman Hake Video: पुण्यामध्ये सोमवारी रात्री मराठा आंदोलक आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणारे आंदोलक लक्ष्मण हाकेंमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. कोंडावा येथे हा राडा झाल्याचं सांगितलं जात आहे. मराठा आंदोलकांनी हाकेंविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर ओबीसी आंदोलकांनाही घोषणाबाजी केल्याचं सांगितलं जात आहे. हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. मराठा आंदोलक हाकेंना जाब विचारत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मराठा आंदोलकांच्या गर्दीमध्ये हाके गोंधळलेल्या अवस्थेत चालत असल्याचं दिसत आहे.
लक्ष्मण हाकेंनी मद्यपान केल्यानंतर त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी केली. मराठा आंदोलक हाकेंना कोंढावा पोलीस स्थानकामध्ये घेऊन गेले. दुसरीकडे हाकेंनी आपण मद्यपान केलेलं नाही असा दावा केला. तसेच माझी वैदयकीय तपासणी करावी असं म्हणताना हाकेंनी आपण कुठेही पळून गेलेलो नाही असंही म्हटलं. हाके यांनी मराठा आंदोलकांचे आरोप फेटाळून लावत, "उलट माझ्याच जीवाला धोका आहे," असं म्हटलं.
हाके यांना कोंढवा पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांची गर्दी जमली होती. या ठिकाणी काही काल तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर कोंढावा पोलीस स्टेशनबाहेरील सर्व विद्युत दिवे बंद करण्यात आले. तरीही पोलीस स्टेशनबाहेरील गर्दी कमी होत नव्हती. दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हाकेंची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनाही पोलिसांकडूनच धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये घडला.
#पुणे
— Brijmohan Patil (@brizpatil) September 30, 2024
ओबीसी नेते लक्ष्मण हाके मद्य प्राशन करताना सापडले त्यावरून गोंधळ. मराठा समाजाला शिवीगाळ केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप
कोंढवा परिसरातील घटना
मराठा कार्यकर्त्यांनी थेट मोर्चाच काढला.#पुणे#punenews pic.twitter.com/uNknCxSTtW
मागील वर्षभराहून अधिक काळापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आक्षण देण्याची मागणी जारांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली आहे. असं असतानाच लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली असून त्यांनी या मुद्द्यावरुन उपोषणही केलेलं आहे. लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये अनेकदा शाब्दिक खटके उडल्याचं आणि त्यांनी एकमेकांवर आरोप केल्याचं पाहायला मिळालं आहे. सोमवारी या संघर्षाचा पुढील टप्पा थेट रस्त्यावर पाहायला मिळाला. मराठा आंदोलकांनी हाके एका मैदानामध्ये मद्यपान करुन अपशब्दांचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. आता या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.