Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Mumbai Rain Live Updates: मुंबई आणि परिसरात तुफान पाऊस, ठिकठिकाणी साचलं पाणी

Maharashtra Mumbai Rain Live Updates: प्रशासनानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई महानगर भागात पावसाचा इशारा पाहता गरज असेल तरच घराबाहेर पडा. राज्याच्या इतर भागांमध्येही पाऊस धडकी भरवतोय.   

Maharashtra Mumbai Rain Live Updates:  मुंबई आणि परिसरात तुफान पाऊस, ठिकठिकाणी साचलं पाणी
LIVE Blog

Maharashtra Weather Rain Alert Live Updates: एकिकडे महाराष्ट्रातून पाऊस उसंत घेत नसतानाच दुसरीकडे मुंबईत हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट (IMD Red Alert in Mumbai) जारी केला आहे. मुंबई आणि उपनगरात गुरुवार दुपारपर्यंत अति मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका, सरकारी आणि खासगी शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्याचा निर्णय मुंबई पालिका आयुक्तांनी जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असला तरीही, शाळांना सुट्टी मात्र देण्यात आलेली नाही ज्यामुळं पालकांमध्ये संभ्रम आणि संतापाचं वातावरण आहे. रत्नागिरीत मात्र पावसाचा वाढणारा जोर पाहता शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विदर्भातही परिस्थिती वेगळी नाही. नागपुरात बुधवारी रात्रभर मेघ गर्जनेसह तुफान पाऊस झाला. परिणामी पुढील 24 तासांसाठी विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

प्रत्येक तासाला पावसाचं प्रमाण कमीजास्त होताना दिसत असून, त्यानुसार वाहतूक आणि दैनंदिन जीवनावरही याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. त्यामुळं याच पावसाच्या सर्व लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथं मिळणार आहेत. 

27 July 2023
27 July 2023 18:11 PM

Maharashtra Mumbai Rain Update : मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात येत्या 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 

27 July 2023 17:20 PM

Maharashtra Mumbai Rain Update : मुंबई आणि परिसरात तुफान पाऊस सुरु असून मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर कायम असून चर्चगेट, दहिसर, नालासोपारा, कल्याणमध्ये पाणी साचलं आहे. मुंबईत पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर वाढलाय. दहिसरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. वसई विरार मध्ये दुपारनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. सखल रस्त्यांवर पुन्हा पाणी साचायला सुरुवात झालीय. नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क, गालानगर, तुळींज रोड, एसटी डेपो, निळेगाव या भागात गुडघाभर पाणी साचलंय. हा पाऊस असाच सुरू राहिल्यास पुन्हा एकदा वसई विरार जलमय होण्याची शक्यता आहे. या साचलेल्या पाण्यामुळे वयोवृद्ध नागरिक, शाळकरी मुले यांना मोठी कसरत करावी लागतेय.नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा गावात गुडघाभर पाणी साचले असून गेल्या आठ ते दहा दिवसापासून त्यांची पाण्यातून सुटका होत नाहीये. या परिसरातील खाड्यांमध्ये माती भराव केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

 

27 July 2023 16:38 PM

Maharashtra Mumbai Rain Update : मुसळधार पावसानं कल्याण-डोंबिवलीला चांगलंच झोडपलंय. सकाळपासन कोसळणा-या पावसामुळे कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड आणि कल्याण रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना येता जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाचा असाच जोर कायम राहिल्यास शहरातील इतर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. 

27 July 2023 15:21 PM

Maharashtra Mumbai Rain Update : कोल्हापुरातली पाऊस परिस्थिती नियंत्रणात आहे. उद्यापासून कोल्हापुरातल्या शाळा सुरू होणार आहेत. संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवली नसल्यामुळे लोकांना उद्या घरी जायला सांगितलंय. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पावसाचा आढावा घेतला. त्यानंतर लोकांना घरी जायला परवानगी देण्यात आलीय. कोल्हापुरात पुराची स्थिती जैसे थे आहे. पाणीपातळीत वाढ झालेली नाही. पंचगंगा नदीच्या पातळीत गेल्या 24 तासांत एक इंचही वाढ झालेली नाही. मात्र असं असलं तरी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवलाय. 

27 July 2023 13:29 PM

Maharashtra Mumbai Rain Live Updates :  यवतमाळच्या कळंबमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक घरं पाण्यात गेलीयत...300 हून अधिक घरात पाणी शिरलं असून, संसार वाचवण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे...कळंब शहरापासून वाहणाऱ्या चक्रावती नदीला पूर आलाय...या पुराचे पाणी शहरात शिरलंय...यामुळे रहिवाशांची प्रचंड तारांबळ उडालीय.  वर्ध्यात गेल्या 12 तासांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय...वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात 200 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला असून हिंगणघाट ते वाळदुर या मार्गावरचा पूल वाहून गेलाय...पुरामुळे हिंगणघाट परिसरातील 200 एकर शेती खरडून गेलीय...
 

27 July 2023 13:25 PM

Maharashtra Mumbai Rain Update : मुंबईत सगळीकडे पावसाची संततधार सुरुय. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय. चर्चगेट, मरीन ड्राईव्ह परिसरात पाणी साचलंय. त्यामुळे वाहतूक मंदावलीय. वाहनांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय. 

27 July 2023 11:31 AM

Maharashtra Rain Live Updates : खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची संतताधार सुरु असल्यामुळं पाणी साठ्यात झपाट्याने वाढ असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत 68.50 टक्के इतका पाणी साठा जमा झाला आहे.

 

27 July 2023 11:29 AM

Maharashtra Rain Live Updates : मुंबईत सगळीकडे पावसाची संततधार सुरु. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय. चर्चगेट, मरीन ड्राईव्ह परिसरात पाणी साचलंय. त्यामुळे वाहतूक मंदावलीय. वाहनांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय. 

 

27 July 2023 10:33 AM

Maharashtra Rain Live Updates : पुणे, मुंबई द्रुतगती मार्गावर पुन्हा खोळंबा होणार. गुरुवारी दुपारी 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार असून, यादरम्यान सैल झालेल्या दरडी हटवण्याचं काम केलं जाईल. 

 

27 July 2023 10:00 AM

Maharashtra Rain Live Updates : यवतमाळ मध्ये पुन्हा मुसळधार पावसाने पुन्हा दाणादाण उडविली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होवू नये याकरीता जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने सर्वच शाळा बंद ठेवण्यात आल्या आहे. मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे वर्धा नदीला पूर आल्याने आपटी व सांगवी गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. बेंबळा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या परिसरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. 

27 July 2023 09:18 AM

Maharashtra Rain Live Updates : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात दरड कोसळल्यामुळं मुंबई गोवा महामार्गवरच्या वाहतुकीवर परिणाम. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, दरड काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महामार्ग विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने माती काढण्याचं काम सुरू आहे. 

 

 

27 July 2023 09:18 AM

Maharashtra Rain Live Updates : रत्नागिरीहून चांदेराईमार्गे लांजा इथे जाणारा रस्ता पावसामुळे बंद. रत्नागिरी - चांदेराई - लांजा रस्त्यावर काजळी नदीचे पाणी आल्यामुळं चांदेराई बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपलं सामान हलवलं आहे. काजळी नदीला पूर आल्यानं जनजीवनावर परिणाम

 

27 July 2023 08:50 AM

Maharashtra Rain Live Updates :  Maharashtra Rain Live Updates : घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर शहरात मध्यम पाऊस. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट, उर्वरित जिल्ह्यात आणि शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात आज कोकणातील काही भाग, घाटमाथा तसेच विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, तसेच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

 

27 July 2023 08:42 AM

Maharashtra Rain Live Updates : पर्यटन तालुका जुन्नरमध्ये निसर्ग सौंदर्य बहरलं आहे. सततच्या पावसामुळे आंबेहापीस परिसरातील छोटे-मोठे धबधबे ओसांडून वाहतायत. घाटमाथ्यावरील हिरवागार निसर्ग आणि धुक्यांनी वेढलेला परिसर पाहण्यासाठी पर्यटकांचीही मोठी गर्दी होतेय.

 

27 July 2023 08:41 AM

Maharashtra Rain Live Updates : कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे. अलमट्टी मधून एक लाख 25 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी.

27 July 2023 08:38 AM

Maharashtra Rain Live Updates : संततधार पावसामुळे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेलाय. गुडघ्या एवढं पाणी साचल्यानं रस्त्यांना तलावाचं स्वरुप प्राप्त झालंय. त्यामुळे विमानतळाकडे जाणारी वाहतूक मंदावली.

 

27 July 2023 08:34 AM

Maharashtra Rain Live Updates : मुंबईच्या सायन परिसरात पावसामुळं वाहतुकीवर थेट परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. 

Read More