Local Body Elections In Maharashtra 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल. मात्र, त्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. 'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत' अशा पद्धतीची भाषा सत्ताधारी आमदाराकडून मित्रपक्षाबद्दलच वापरली जात आहे. आगामी निवडणुकीमध्ये मित्रपक्षालाच लक्ष्य करण्याचा आमदाराचा मानस आहे. याचा फटका महायुतीला बसू शकतो असंही मानलं जात आहे.
महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष या दोन आघाड्यांमध्ये आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये तर काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट महाविकास आघाडीमध्ये आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अद्याप स्वतंत्र आहे. ते कुठल्याही आघाडीत नाहीत. महाराष्ट्रात मागच्या तीन-साडेतीन वर्षांपासून महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यात महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्ष एकत्रपणे लढणार की, स्वतंत्रपणे ते अजून स्पष्ट नाहीय.
उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झालाच, तर स्थानिक पातळीवर मनोमिलनासाठी महायुतीच्या बड्या नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील. नंदूरबार जिल्हा याचं एक उदहारण आहे. तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजप आणि शिवसेना आमदारांमधील बेबनाव समोर आला आहे. डॉ. विजयकुमार गावित हे नंदूरबारमधील वजनदार नेते आहेत. सध्या ते भाजपमध्ये आहेत. डॉ. विजयकुमार गावित यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रीपदही भूषवलं आहे.
माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पुन्हा शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत, एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरा आमदार आमश्या पाडवी!” डॉ. गावित यांच्या विधानामुळे भाजप आणि शिंदे गटाचा वाद विकोपाला पोहोचला आहे. ‘शिंदे गटाच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे’ असं डॉ. विजयकुमार गावित म्हणाले.
नंदूरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदारांमधील वाद समोर आला आहे. भाजपचे माजी मंत्री आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमश्या पाडवी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी “माझे फक्त दोनच टार्गेट आहेत, एक चंद्रकांत रघुवंशी आणि दुसरा आमश्या पाडवी” असं विधान करत शिंदे गटाच्या आमदारांची “मस्ती जिरवण्याचा” मानस व्यक्त केला आहे.
महायुतीतील पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला, तर स्थानिक पातळीवर पक्षांमधील मतभेद आणि वाद मिटवण्यासाठी बड्या नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील. नंदूरबारमधील वाद हे याचं उदाहरण आहे, जिथे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमधील बेबनावामुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, असं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 मे 2025 रोजी सांगितलं की, निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेळेवर होतील, परंतु पावसामुळे काही भागात 15-20 दिवसांची मुदतवाढ मागितली जाऊ शकते.