Local Body Elections In Maharashtra: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. खास करुन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होईल असा दावा केला जात असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगळेच आदेश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सर्व जागा लढण्याची तयारी करा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पादाधिकाऱ्यांना दिले आहेत. मंगळवारी मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हे आदेश दिलेत. युतीचा जो काही निर्णय असेल तो पक्ष घेईल, तुम्ही कामाला लागा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आमागी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मातोश्री' निवावस्थानी पादाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्येच ठाकरेंनी सर्व जागा लढण्यासाठी तयारी करा असं सांगितलं आहे.
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मुंबई महानगर परिसरामधील 7 महापालिकांच्या परिस्थितीचा आढावा उद्धव ठाकरेंनी घेतला. ज्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार या पालिकांचा समावेश आहे. या महापालिकांमध्ये पक्षाची ताकद किती आहे? पक्षीय बालबल किती आहे हे उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतलं. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची घोषणा होईल, असंही ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगताना तयारीला लागण्याचे आदेश दिलेत.
महापालिका निवडणुकींच्या दृष्टीकोनातून संघटनात्मक बांधणी करा. न्यायालयाच्या निर्णयानंतर नव्या प्रभाग रचनेनुसार आगामी निवडणुका होणार असून त्याकडे विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत. मनसेबरोबर युतीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल. त्याबद्दलची माहिती देखील सर्वांना दिली जाईल, असा शब्द उद्धव ठाकरेंनी दिला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढले तर राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आमची सत्ता नक्कीच येईल, असा विश्वास उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. आमच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून दोघे एकत्र लढले तर मुंबईबरोबरच ठाणे, कल्याण, पुणे आणि नाशिकमध्येही बहुमत प्राप्त करु असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरेंनी कोणत्या महापालिकांचा आढावा घेतला?
उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगर परिसरातील सात महापालिकांचा आढावा घेतला, ज्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी आणि वसई-विरार यांचा समावेश आहे. त्यांनी या पालिकांमधील पक्षाची ताकद आणि संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला.
पदाधिकाऱ्यांना कोणत्या खास सूचना देण्यात आल्या आहेत?
उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना महापालिका निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार असून, प्रभाग रचनेवर विशेष लक्ष ठेवण्याचे आणि निवडणूक तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
मनसेबरोबर युतीबाबत उद्धव ठाकरेंचे काय मत आहे?
उद्धव ठाकरेंनी सांगितले की, मनसेबरोबर युतीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल आणि याबाबतची माहिती सर्वांना दिली जाईल. त्यांनी कार्यकर्त्यांना युतीच्या घोषणेची वाट न पाहता सर्व जागांसाठी तयारी करण्यास सांगितले आहे.