Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सतेज पाटील म्हणतात 'आमचं ठरलंय'

सतेज पाटलांनी जे ठरवलंय ते २३ मे ला सत्यात उतरेल का? 

सतेज पाटील म्हणतात 'आमचं ठरलंय'

प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर : कोल्हापुरात आघाडीत बिघाडी झालीय. काँग्रेसच्या सतेज पाटलांनी युतीचे उमेदवार असलेल्या संजय मंडलिकांचा प्रचार सुरू केलाय. याच धर्तीवर पाटील समर्थकांनी 'आमचं ठरलंय' ही मोहीमच सुरू केलीय. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कार्यकर्त्यांच्या खांद्यावरून विजयाची खूण करणाऱ्या सतेज पाटील आणि संजय मंडलिकांना पाहून धनंजय महाडिकांच्या पोटात गोळा आलाय. 

राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांशी असहकार पुकारलेल्या सतेज पाटलांनी 'आमचं ठरलंय' ही टॅगलाईन घेऊन संजय मंडलिकांचा प्रचार सुरू केलाय. वाढदिवसाच्या बॅनरवरही भगव्या रंगातलं 'आमचं ठरलंय' हे घोषवाक्य खूप काही सांगणारं आहे. 

कोल्हापुरात काँग्रेस राष्ट्रवादीत गट-तट असल्याचं नेते सांगतात. सतेज पाटलांच्या नाराजीची त्यांना कल्पना आहे. पण स्थानिक काँग्रेस नेते सतेज पाटलांबाबत हतबल आहेत.

सतेज पाटील आणि त्यांच्या समर्थकांचं काय ठरलंय, ते कोल्हापूरला माहिती झालंय. सतेज पाटलांनी जे ठरवलंय ते २३ मे ला सत्यात उतरेल का? हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

Read More