Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'...नाहीतर माझ्या घराची पायरी चढू नका' अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

Ajit Pawar disappointed on Party Workers:काही वर्षांपूर्वी माझ्या तोंडून चुकून ते धरणातील वाक्य गेले आणि त्याचा फार मोठा फटका मला बसला असे अजित पवार यांनी आवर्जून सांगितलेय.

'...नाहीतर माझ्या घराची पायरी चढू नका' अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती:  उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी राज्यात चर्चेत असतात. ते भाषणादरम्यान मध्येच बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टेजवरुन चिमटे काढताना दिसतात. अनेकदा बोलण्याच्या भरात त्यांच्याकडून भलतीच विधाने निघतात. पण काही चुकीचे शब्द वापरले गेल्यास ते तात्काळ माफीदेखील मागताना दिसतात. दरम्यान अजित पवारांचे एक विधान सध्या सोशल मीडियात व्हायरल होतंय. यामध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांना सज्जड दम देताना दिसतायत. 

इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथील वक्तव्य अजूनही अजित दादांना चांगलेच बोचते आहे. आजही त्यांनी शिर्सुफळ येथील सभेत बोलताना याचा उल्लेख केला. काही वर्षांपूर्वी माझ्या तोंडून चुकून ते धरणातील वाक्य गेले आणि त्याचा फार मोठा फटका मला बसला असे अजित पवार यांनी आवर्जून सांगितलेय..

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.. या सभेत पवार बोलत होते..

अजित पवार हे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली तर पुन्हा माझ्या घरची पायरी चढायचं नाही. काहीजण माझी सभा झाली रे झाली की, समोरच्या पार्टीकडे जातात. बिनविरोध पदे मी दिली आणि प्रचार मात्र त्यांचा करत आहेत, असे अजित पवार म्हणाले. 

आपले विधान आणखी स्पष्ट करण्यासाठी अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं..कुंकू लावायचा असेल तर एकाचेच लावा. माझे तरी लावा नाहीतर त्यांचे तरी लावा. हा काय चाटाळपणा लावलाय. हे झाकून राहत नाही. मला कळते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतसुद्धा मला कळले होते. पण जुने पुराने उकळून काढायचे नाही, असे मी ठरवल्याचे अजित पवार म्हणाले. 

ते वाक्य वापरताना अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा संदर्भ घेतला आणि ते म्हणाले की उद्या कदाचित ते बोलतील अजितदादा दम द्यायला लागलेत पण मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतोय. अशा स्वरूपात अप्रत्यक्षरीत्या रोहित पवार यांना त्यांनी टोला मारलाय.

पण हे बोलतानाच त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नेते  देशमुख यांच्या उपोषणाचा संदर्भ घेऊन जे वाक्य वापरले होते आणि त्यातून त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.. त्याचा संदर्भ पुन्हा एकदा घेतला.. आणि त्यांनी सांगितले की, मी माझ्या मेंदूला सातत्याने सांगत असतो की आपल्याला शब्द जपून वापरायचे आहेत, असे ते यावेळी म्हणाले. 

Read More