महादेवी हत्तीणीबाबत हिंदुस्थानी भाऊनं सोशल मीडियावर एका व्हीडिओ शेअर केला. या व्हिडीओत हिंदुस्थानी भाऊनं कोल्हापूरकरांना शिवीगाळ केली. त्यानंतर कोल्हापूरकरांनी शिवराळ हिंदुस्थानी भाऊला सडेतोड उत्तर दिलंय. त्यावर आता नवा व्हीडिओ शेअर करून हिंदुस्थानी भाऊनं स्पष्टीकरण दिलंय.
कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण वनताराला नेण्यात आली. यानंतर कोल्हापूरकर प्रचंड भावूक झालेत. महादेवी हत्तीण परत द्या यासाठी कोल्हापुरात मोठी जनचळवळ उभी राहत आहे. अशातच या वादात आता हिंदुस्थानी भाऊनं उडी घेतली. महादेवी हत्तीणीला परत कोल्हापुरात आणण्याची मागणी करणा-यांना त्यानं शिवीगाळ केली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्याचा दावाही हिंदुस्थानी भाऊनं केलाय.
हिंदुस्थानी भाऊनं त्याच्या 6 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये अनेक शिव्यांचा वापर केला. यानंतर त्याला प्रचंड निगेटिव्ह कमेंट्स यायला सुरुवात झाली. कोल्हापूरकरांना शिव्या घातल्या म्हणून असंख्य कमेंट आल्या. हिंदुस्थानी भाऊनं कोल्हापूरकरांचा, त्यांचा भावनांचा अनादर केल्याचा आरोप होतोय. यानंतर कोल्हापूरकरांनी आपल्या शैलीत हिंदुस्थानी भाऊचा समाचार घेतलाय.
कोल्हापुरी हिसका दाखवतो म्हटल्यावर हिंदुस्थानी भाऊ लगेच नरमला. आपण काय बोलून गेलो याची उपरतीच हिंदुस्थानी भाऊला झाली. म्हणूनच त्यानं एक नवा व्हिडीओ शेअर करून स्पष्टीकरण दिलंय. आईची शप्पथ घेऊन हिंदुस्थानी भाऊनं कोल्हापूरकरांबद्दल बोललोच नव्हतो असं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
सुप्रीम कोर्टानं 'महादेवी'चा ताबा वनताराकडे दिला आहे, तर वनताराच्या प्रशासनाकडून न्यायालयामार्फत 'महादेवी' वनताराकडे आलीय. त्यामुळं वनताराकडून 'महादेवी'ला परत आणण्यासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. पदयात्रेनंतर मुंबईपर्यंत सूत्रं हलली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक घेऊन चर्चाही केलीय. महादेवीला परत कोल्हापूरला आणण्यासाठी मोठी चळवळ उभी केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात कोर्ट याप्रकरणात काय भूमिका घेतं याकडे लक्ष लागलंय.