Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बजेटच्या निधी वाटपात अजितदादांची सरशी, शिवसेनेकडील खात्यांना सर्वात कमी निधी; भविष्यात महाभारत होणार?

Maharashra Budget 2025: निधीवाटपावरुन पुढच्या काळात महायुतीत धुसफूस उफाळून येण्याची शक्यता आहे.

बजेटच्या निधी वाटपात अजितदादांची सरशी, शिवसेनेकडील खात्यांना सर्वात कमी निधी; भविष्यात महाभारत होणार?

Maharashra Budget 2025: अर्थमंत्री अजित पवारांनी सोमवारी मांडलेल्या बजेटमधील निधीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सर्वाधिक निधी मिळालाय तर भाजप दुस-या  आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना शेवटच्या स्थानी आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंकडील नगरविकास खात्याच्या निधीलाही कात्री लावल्याचं दिसतंय.. या निधीवाटपावरुन पुढच्या काळात महायुतीत धुसफूस उफाळून येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या निधीती 10 हजार कोटींची कपात

महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडताना शिवसेनेच्या नेत्यांनी अजितदादा निधी वाटपात दूजाभाव करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. या गोष्टीला आता तीन वर्ष होत आली. पण आता पुन्हा अशीच बोंब महायुतीत होण्याची शक्यता आहे. कारण अजितदादांनी अर्थसंकल्पात केलेली तरतूद पाहता सर्वात कमी आर्थिक तरतूद शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना करण्यात आलीये. मुख्य बाब म्हणजे एकनाथ शिंदेंच्या खात्याला दिलेला निधीत गेल्या वर्षांपेक्षा 10 हजार कोटींनी कपात झालीये.

महायुतीतलं अंतर्गत राजकारण

भाजपच्या मंत्र्यांच्या खात्यांना 1 लाख कोटींचा निधी देण्यात आलाय.शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना 87 हजार कोटी देण्यात आलेत.तर राष्ट्रवादीला 2 लाख 47 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये.अर्थखातं अजित पवारांकडं असल्यानं त्यांच्या खात्याला तरतूद आहे. शिवाय लाडकी बहीण योजना असलेल्या महिला व बालकल्याण खात्यासाठीही जास्त निधी खर्च होणार आहे. एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना कमी निधी देण्यामागं महायुतीतलं अंतर्गत राजकारण असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

महाभारत होण्याची शक्यता

शिवसेनेनं मात्र हे आरोप फेटाळलेत. खात्यांसाठी निधी वैगेरे या गोष्टी वायफळ असल्याचं शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी सांगितलंय.महायुती आता सारवासारव करत असली अजितदादांच्या खात्याला जादाचा निधी आहे ही वस्तूस्थिती आहे. आता महायुतीत कोणतीही धुसफूस नसल्याचं शिवसेना नेते सांगत असले तरी भविष्यात यावरुन मोठं महाभारत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read More