Jitendra Awhad Handcuffs: महाराष्ट्राच्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. काल सायंकाळी सत्ताधारी आणि विरोधकांचा चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर आज सकाळी दहा वाजण्यापासून आमदारांनी विधानभवनात येण्यास सुरुवात केली. मात्र साडेदहाच्या सुमारास विधानभवनामध्ये प्रवेश करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हातात चक्क बेड्या होत्या. आव्हाड यांनी दोन्ही हातात बेड्या घालून हात उंचावून विधानसभेच्या आवारात प्रवेश केला. आव्हाड यांचं हे रुप पाहून अनेकजण गोंधळून गेले. आव्हाड यांना बेड्या का घालण्यात आल्या? याबद्दल कुजबूज सुरु झाली. मात्र आव्हाड यांनीच पत्रकारांशी चर्चा करताना माहिती दिली.
आव्हाड यांना पत्रकारांनी तुमच्या हातात बेड्या का? असा प्रश्न विचारला. त्यावर आव्हाड यांनी, "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय. ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांचे आवाज बंद केले जात आहेत ही पद्धत चुकीची आहे. आमचा संवैधानिक अधिकार आहे. आम्हाला व्यक्त होताच आलं पाहिजे. व्यक्त होण्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार हा आमचा मूलभूत अधिकार आहेत. हा मूलभूत अधिकार शाबूत राहिला पाहिजे यासाठी या बेड्या आहेत," असं उत्तर दिलं.
पुढे बोलताना आव्हाड यांनी, "या बेड्या यासाठी पण आहेत की, अमेरिकेत व्हिसाच्याबाबतीत भारतीयांवर अन्याय होत आहेत. व्हिसाच्याबाबतीत ट्रम्प सरकारने आखलेलं धोरण हे अनेक भारतीयांचं घर-संसार उद्धवस्त करणारं आहे. ज्या पद्धतीने भारतीयांना कोंबून भारतात पाठवलं. पायात साखळदंड, हातात हातकड्या, शौचालयाला जागा नाही, उपाशी असं भारतीयांना अपमानित करुन आणण्याचा प्रकार भारताला हिणवणारा होता. यात कोण्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते. आपल्या महाराष्ट्रातील अनेकजण या पेचात अडकलेत. पोर अमेरिकेत राहतील तर आई-बाप महाराष्ट्रात येतील किंवा आई-बाप तिथे राहातील तर पोरं महाराष्ट्रात येतील. अशाप्रकारे अमेरिकेत जाऊन मोठं होण्याची मराठी माणसाची स्वप्नं उद्धवस्त होत असताना दिसत आहेत," असं आव्हाड म्हणाले.
हातातील बेड्या दाखवत आव्हाड यांनी, "जर या बेड्यांमुळे आपण बोलणारच नसू, अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या अन्यायावर बोलणारच नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल. म्हणून प्रातिनिधिक स्वरुपात तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगत आहेत हे लोकांना दाखवण्यासाठी या बेड्या आहेत. हे सारं दर्शवण्यासाठीच या बेड्या माझ्या हातात आहेत. आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका आणि अन्यायाविरुद्ध आवाज उचलायला शिका. अमेरिका आपली बाप नाही," असंही म्हटलं.