मुंबईला महाराष्टापासून कोणी तोडू शकत नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरी मुंबई महाराष्ट्राचीच आहे असं ठणकावून सांगितलं. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र, मुंबईत मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील असं सांगितलं. एक सर्वसमावेशक मुंबई आणि तसाच प्रगतशील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करु असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
"लोक वर्ष दीड वर्षाने मुंबईत येतात तेव्हा बदललेली मुंबई पाहायला मिळते. अण्णाभाऊ साठे यांनी जी व्यथा मुंबईत अनुभवली ती दुसऱ्या कोणाच्या वाट्याला येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आपण करत आहेत," असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांची कविता वाचून दाखवली.
पुढे ते म्हणाले, "चार महिन्यानंतर भाषणं सुरु होतील की महाराष्ट्राला मुंबईपासून तोडण्याचं षडयंत्र सुरु झालं आहे. त्यामुळे आताच सांगतो की, मुंबईला महाराष्टापासून कोणी तोडू शकत नाही. कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरी मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्राचीच राहील. महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील. यानिमित्ताने आधुनिक मुंबई, एक सर्वसामवेशक मुंबई आणि तसाच प्रगतशील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करु".
ही विधानसभा आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या मालकीची नाही. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या मालकीची ही विधानसभा आहे. समाजाला दिशा देणारे काम झाले पाहिजे. विचारातून चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे.
आपण दोघांना सांगितले व त्यांनी खेद व्यक्त केला. शब्दातून निघणारे विष हे नागाच्या विषापेक्षा अधिक विषारी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
काल जी मारामारी झाली, कोणासोबत कोण येतंय? याबाबत शिस्त असली पाहिजे. सर्जेराव टकले यावर सहा गुन्हे आहेत तर नितीन देशमुख वर 8 गुन्हे आहेत. अशी मंडळी येऊन मारामारी करतात, हे योग्य नाही. अध्यक्षांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. काहींनी चूक केली म्हणून सर्वांना शिक्षा नको. योग्य सुरक्षाव्यवस्था उभारा. कुठलाही अभ्यागत येऊ द्या, बिल्ल्याशिवाय तो दिसता कामा नये. एखाद्याने येऊन दहशतवादी हल्ला केला तर जबाबदारी कोण?आमदार बिल्ला लावून येतात. पण अभ्यागतांच्या गळ्यात किमान एक ओळखपत्र असावे. हे झालेच पाहिजे,नाहीतर सुरक्षा रक्षकांनी त्यास बाहेर काढावे असं मत त्यांनी मांडलं आहे.