उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही. आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा अशी ऑफर देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते खेळीमेळीने बोलले असून, त्याच प्रकारे घ्यायला हवं असं सांगत जास्त बोलणं टाळलं. तसंच तो प्रसंग बाका होता असंही उपहासात्मकपणे म्हणाले. दरम्यान आज विधानभवनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांना भेटून हस्तांदोलन केलं.
"उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही. आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले. याबद्दल उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी प्रसंग बाका आहे. ते खेळीमेळीने बोलले असून, खेळीमेळीनेच घ्यायल्या हव्यात असं त्यांनी सांगितलं.
ऑपरेशनचा माझ्याइतका अनुभव नाही. मी छोटी ऑपरेशन करत नाही, मोठी ऑपरेशन करतो असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे-प्रकाश आंबेडकर युतीवरुन लगावला. एकनाथ शिंदेंवर टीका करताना ते म्हणाले की, "सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो हे माझ्या वडिलांचा आणि आजोबांचं कर्तृत्व आहे. आमची परिस्थिती काय आणि कशी होती हे त्यांना माहित आहे. ज्यांनी त्यांना सोन्याच्या चमच्याने भरवलं, त्या अन्नाशी प्रताडणा केली हे पाप जनता विसरु शकणार नाही".
"त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. मराठी माणसाला आपल्या हक्काची रोजीरोटी शिवसेना प्रमुखांनी दिली. हे आयत्या ताटावर असलेली लोक, त्यांनी खाल्ल्या ताटात प्रताडणा केली. लोक त्यांना ओळखून आहेत," अशी टीकाही त्यांनी केली.
ठनाशिकमध्ये भाजपात यायला कोणताही अडथळा असू नये म्हणून ज्यांच्यावर 15-20 दिवसांपूर्वी आरोप झाले म्हणून पक्षातून काढलं, त्यांच्यावरील आरोप मागे घेऊन भाजपात प्रवेश दिला जात आहे इतकी यांची नितिमत्ता खालावली आहे हे दुर्देवी आहे. यांची राजकारणाची पातळी किती खालावली आहे. कोणावर काहीही आरोप करायचे, आयुष्यातून उठवायचं, बदनाम करुन टाकायचं. पण त्यांच्या पक्षात जात आहे समजल्यावर आरोप मागे घ्यायचे आणि जणू काही गंगेत न्हाऊन पक्षात घेतलं हे राजकारण फार वाईट आहे," असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
"उद्या दाऊद भाजपात गेला तर त्याच्यावरील दहशतवादाचे गुन्हे मागे घेताना मागे पुढे पाहणार नाहीत. याचं कारण आधी सलीम कुत्तासोबत पार्टी केली म्हणून आरोप केले. इक्बाल मिर्चीसोबत व्यवहार केला म्हणून आरोप केले. पक्षात गेल्यानंतर ते आरोप मागे घेतले गेले. नवाब मलिक यांचंही उदाहण आहे. पक्षात गेल्यानंतर ते धुतले गेले. यांना भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र नाही तर भ्रष्टाचार आरोपमुक्त पक्ष करायचा आहे. तुमच्यावरील आरोप पुसून टाकतो आमच्या पक्षात या असं सुरु आहे. राजकारण इतक्या पातळी गेलं आहे. अशावेळी आम्ही आमने सामने आलो या गोष्टी गौण आहेत," असंही ते म्हणाले.