Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'टिमकी'ची अस्तित्वाची लढाई, महाराष्ट्रातल्या शेकडो वर्षांच्या परंपरेला घरघर!

Timki Demand: टिमकी व्यवसायाला आता घरघर लागली आहे.

'टिमकी'ची अस्तित्वाची लढाई, महाराष्ट्रातल्या शेकडो वर्षांच्या परंपरेला घरघर!

Timki Demand: होळी सण म्हणजे एकमेकांना रंग लावणं, पिचका-या मारणं, पुरणपोळीचा आस्वाद घेणं एवढा पुरताच मर्यादित नाही. आपल्या राज्यात अनेक ठिकाणी विविध पद्धतीनं होळीचा सण साजरा केला जातो. यात एक अनोखी परंपरा जोपासली जाते ती म्हणजे होळी पेटल्यावर टिमकी वाजवणं. मात्र आता टिमकी बनवणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आलीय.

टिमकी व्यवसायाला आता घरघर

'टिमकी वाजवणे' हा वाक्प्रचार अनेकदा वापरला जातो. मात्र हीच टिमकी आता अस्तित्वाची लढाई लढतेय. काळ बदलला तसं सणवार साजरे करण्याची पद्धत बदलली. पूर्वी होळी सणाचे वेध लागायचे ते टिमकीमुळे. होळी सणाला गावातली मुलं एकत्र जमायची आणि होळी पेटवल्यानंतर जोरजोरात टिमकी वाजवायची. त्यावेळी टिमकीची आवडही होती आणि मागणीही होती. मात्र काळानुसार पारंपरिक टिमकीची जागा प्लास्टीक आणि फायबरच्या टिमकीनं घेतल्यानं चामड्याच्या टिमकी बनवणारे कारागिर संकटात सापडले. तसंच हल्लीच्या पिढीला मोबाईलच वेड असल्यानं टिमकी वाजवण्यात त्यांना रस नाही. परिणामी, मागणी कमी होऊन टिमकी तयार करणा-या कारागिरांवर उपासमारीची वेळ आलीय. नाशिकच्या येवल्यात होळीनिमित्त टिमकी बनवण्याची लगबग सुरू आहे. मात्र या टिमकी व्यवसायाला आता घरघर लागली आहे.

शेकडो वर्षांची परंपरा 

हल्ली वाढत्या शहरीकरणामुळे होळी सणाचं स्वरूप बदललं. मात्र अजूनही टिमकी बनवणारे कारगिर आहेत. आपल्या टिमकी जास्त विकल्या जाव्यात, यासाठी यावर अनोखे संदेश लिहिले जातात. होळीच्या सणाला टिमकी बनवण्याची, ती वाजवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही कला जोपासली जावी, एवढीच माफक अपेक्षा हे कारागीर व्यक्त करत आहेत.

14 की 15 मार्च कधी आहे होळी?

होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते. हिंदू धर्मात होलिका दहन करण्याची जुनी परंपरा आहे. यंदा होळी सणाच्या तारखेबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यासोबत यंदा होळीच्या दिवशी या वर्षातील पहिल चंद्रग्रहण आल्यामुळे होळीला रंगांची उधळण करता येणार आहे की नाही, असा प्रश्न पडलाय. महाशिवरात्रीनंतर येणारा सण असतो तो म्हणून होळीचा. या हिंदू धर्मातील खास सणाच्या तारखेबद्दल लोकांमध्ये गोंधळ पाहिला मिळतो. होळीचा सण नेमका कोणत्या तारखेला आहे, हिंदू पंचांग काय सांगत पाहूयात. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो. होळीचा सण पौर्णिमेच्या तिथीनुसार आणि होलिका दहनाच्या शुभ मुहूर्तानुसार निश्चित केला जातो. वैदिक कॅलेंडरनुसार, फाल्गुन पौर्णिमा 13 मार्च रोजी सकाळी 10:35 वाजता सुरू होईल आणि 14 मार्च रोजी दुपारी 12:23 वाजता संपेल. उदयतिथीमुळे, रंगांची होळी 14 मार्च 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ वैध राहणार नाही, म्हणून होळीला रंग खेळण्यास कुठलंही बंधन नसणार आहे. ब्रज प्रदेशात होळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते, ज्यामध्ये मथुरा, वृंदावन, गोवर्धन, गोकुळ, नांदगाव आणि बरसाना यांचा समावेश आहे. हा उत्सव दोन दिवस चालतो.जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते तेव्हा चंद्रग्रहण होते. ज्यामुळे सूर्याची किरणे चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि तो अंशतः किंवा पूर्ण अंधारात बुडातो. नासाच्या वेबसाइटनुसार, 2025 चे पहिलं चंद्रग्रहण अमेरिका, पश्चिम युरोप आणि पश्चिम आफ्रिकेत दिसेल.

Read More