Ajit Pawar In Iftar Party: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मुंबईमधील इफ्तार पार्टीला हजेरी लावली. यावेळी अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. मागील काही काळापासून धार्मिक तेढ वाढवणारी प्रकरणं समोर येत असतानाच अजित पवार यांनी सूचक शब्दांमध्ये मुस्लिम समाजाला सुरक्षेसंदर्भात आश्वस्त केलं.
"रोज रोजे ठेवणाऱ्या रमजान साजरा करणाऱ्या मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा," असं म्हणत अजित पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. "रमजानचा पवित्र महिना तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि आनंद घेऊन येवो, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो. समाजात एकता बंधुत्व निर्माण करणारा हा महिना आहे," असंही अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवारांनी, "रमजान केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही. रमजान आपल्याला एकता बंधुत्वाची संदेश देण्याबरोबरच गरजूंची पीडा समजण्याची प्रेरणा देतो," असंही नमूद केलं.
"भारत विविधतेमध्ये एकतेच प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज यांनी जातींना एकत्र घेऊन समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला आपल्याला हाच वारसा पुढे न्यायचा आहे," असं अजित पवार म्हणाले. "समाज विभाजन करणाऱ्या शक्तींच्या बोलण्यात न येता आपली ऐकताच आपली ताकद आहे हे लक्षात घ्या. तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या सोबत आहे," असं अजित पवार यांनी भाषणात म्हटलं.
अजित पवार यांनी सूचक विधान करताना, "मुस्लिम बांधवांना जो पण डोळे दाखवणार, दोन गटात भांडण लावून कायदा व्यवस्था बिघडवणार आणि कायदा आपल्या हातात घ्यायची गोष्ट करणार, तो जो कोणी असेल त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. माफ केलं जाणार नाही," असंही म्हटलं आहे.
अजित पवार यांनीच आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाऊंटवरुन मरिन लाईन्स इथं आयोजित करण्यात आलेल्या या इफ्तार पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. "रमजाननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित दावते-ए-इफ्तारमध्ये सहभागी झालो. या विशेष कार्यक्रमात सर्व समाज घटकाचे लोक मोठ्या आनंदानं सामील झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो," असं अजित पवारांनी हे फोटो शेअर करताना म्हटलं आहे.
रमजान निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित दावते-ए-इफ्तारमध्ये सहभागी झालो. या विशेष कार्यक्रमात सर्व समाज घटकाचे लोक मोठ्या आनंदानं सामील झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 21, 2025
मरीन लाईन्स, मुंबई pic.twitter.com/kSck8pl6LB
मरिन लाईन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीसाठी अजित पवारांबरोबरच प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरेही उपस्थित होते.