Pahalgam Terror Attack Helpline Cumber: काश्मीरची भूमी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यामुळे हादरली आहे. पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यामुळं संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 10 दहशतवाद्यांनी पहलगाम येथे आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे तर पंतप्रधान मोदी सौदी दौरा अर्धवट सोडून दिल्लीत दाखल झाले आहेत. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही समावेश आहे.
पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक अडकले आहेत. आम्हाला महाराष्ट्रात सुरक्षित न्या, अशी मागणी पर्यटकाकंडून केली जाते. या पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24x7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.
श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालिन परिस्थिती संपर्क साधता यावा यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात 24x7 मदत कक्ष / आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. दूरध्वनी क्रमांक 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543 आणि व्हॉट्सअॅप क्रमांक 7006058623, 7780805144, 7780938397 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा मृत्यू झालाय डोंबिवलीतील पश्चिम भागशाळा मैदान इथल्या सावित्री अपार्टमेंटमध्ये राहणारे हेमंत जोशी या हल्ल्यात मृत्यू पावलेत. मुलाची दहावीची परीक्षा संपल्यानंतर हेमंत जोशी हे आपल्या पत्नी व मुलासह फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते .मात्र काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारत हेमंत जोशी यांचा मृत्यू झालाय. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये शोककळा पसरलीय. त्यांच्या कुटुंबीयांनी, आजूबाजूच्या रहिवाशांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय. सरकारने ठोस पावलं उचलण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.