Maharashtra Jivant Satbara Mohim : राज्यात आता शेतक-यांचा जीवंत सातबारा असणार आहे. अनेकदा मृत वारसाचं नावं हटवून नवीन नोंदणी प्रक्रियेमध्ये दिरंगाई होते. त्यामुळेच महसूल विभागाने जिवंत सातबारा मोहिम सुरू केली आहे. 1 एप्रिल पासून दहा मे पर्यंत ही मोहिम असणार आहे. शेतक-यांना याची माहिती व्हावी म्हणून झी 24 तासने शेतकऱ्यांसाठी जनजागरण मोहीम हाती घेतली आहे.
सातबा-यावर वारसा नोंदणी प्रक्रिया, हि तशी किचकट प्रक्रीया. अनेक वेळा मृत खातेदारांच्या नावावरच जमिनी राहतात, त्यामुळे त्यांच्या वारसांना मालकी हक्क मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते. या प्रक्रियेत वेळ जातो, सोबतच मोठा खर्चही असतो...मात्र शेतक-यांचा हा त्रास आता वाचणार आहे. कारण शेतक-यांना आता जिवंत सातबारा मिळणार आहे. याबाबत सरकारकडून मोहीम राबवली जातीये...एक एप्रिल पासून दहा मे पर्यंत ही मोहिम असणार आहे.
या मोहीमेत गावनिहाय मृत खातेदारांची यादी तयार केली जाणार आहे. 20 एप्रिलपर्यंत वारसासंबंधी आवश्यक कागदपत्र सादर करावे लागणार आहेत. मृत्यू दाखला, वारशाबाबत सत्य प्रतिज्ञा लेख, स्वयंघोषणापत्र, सर्व वारसांच्या नावे व पत्ते ही कागदपत्रे तलाठी यांच्याकडे सादर करावी लागणार आहेत. यानंतर 21 एप्रिल ते 10 मे दरम्यान ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार केले जातील.
जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कार्यपद्धतीचा अवलंब करत सातबारा दुरुस्त केला जाईल. विशेष म्हणजे यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही. महसूल विभागाकडून स्वत:हून वारसाची नोंद केली जाणार आहे. अर्जदाराला स्वत: अर्ज करण्याची गरज भासणार नाही, तर महसूल यंत्रणा पुढाकार घेईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
साताबारा उतारा हा शेतक-यांसाठी अतिशय मह्तवाचा दस्तावेज आहे. मात्र, अनेकदा यामध्ये वारशांची नोंद करणं, मृत वारशाचं नाव काढणं अवघड होतं. आता मात्र सरकार गावोगावी जिवंत सात बारासाठी मोहिम राबवली आहे. यामुळे जमिनीचा मालकी हक्क सहज आणि जलद मिळवता येणार आहे, त्यामुळे शेतक-यांनो वेळ न दवडता आताच कागदपत्रांची जुळवाजुळव करा आणि तलाठी कार्यालय गाठा.