Ladki Bahin Installment: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट देण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाच वातावरण असल्याचं म्हटलं जात होतं. पण आता लाडक्या बहिणींची नाराजी समोर आली आहे. मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना 2 हफ्ते एकत्र मिळणार होते. पण त्याऐवजी एकच हफ्ता मिळाल्याची प्रतिक्रिया महिला व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. 7 मार्च रोजी बॅंकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ लागले पण हा आनंद काही वेळच टिकला. महिलांना बॅंक खात्यात 3 हजार येतील अशी अपेक्षा होती. पण राज्यभरात काही ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 1500 रुपयेच जमा झाले आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दोन महिन्यांची रक्कम दिली जाणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात बहिणींच्या खात्यात एकाच महिन्याचे जमा झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी अनेक महिलांच्या खात्यात फक्त 1500 जमा झाले. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केलीय. लाडकी बहीण योजनेचे खात्यात 3 हजार रुपये येतील अशी अपेक्षा होती. पण 1500 रुपयेच आले, अशी प्रतिक्रिया महिलांनी 'झी 24 तास'शी बोलताना दिली.
लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशानात देण्याच्या घोषणेपासून सरकारनं घूमजाव केलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशानात 2100 रुपये देण्याचं आश्वासन कधीच दिलं नसल्याचं महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेंनी सांगितलंय. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना निवडणुकीत गेंमचेंजर ठरली. राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यावर लाडक्या बहिणांना 1500 रुपयांवरून 2100 रुपये दिले जातील असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. मागील अधिवेशनात तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपयांसदर्भातली घोषणा करणार असल्याची माहिती दिली होती. मात्र आता यावरून सरकारने घूमजाव केलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केली नाही. तो जाहीरनामा 5 वर्षांसाठी असल्याचं आदिती तटकरेंनी सांगितलंय.
महायुती सरकारने जाहिरनाम्यात दिलेली आश्वासनं खोटी होती ते हळू हळू स्पष्ट होत असल्याचं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनिल प्रभू यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. तर सरकारच्या या घुमजाववरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीका केलीय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या सुमारे 2.5 कोटी लाभार्थ्यांमध्ये जवळपास 83% लाभार्थी विवाहित महिला आहेत. अविवाहित महिला लाभार्थ्यांपैकी 11.8% आहेत तर विधवांचा वाटा 4.7% आहे. घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिला एकत्रितपणे 1% पेक्षा कमी लाभार्थ्यांचे आहेत, असे आकडेवारीवरून दिसून येते. घटस्फोटित महिला एकूण लाभार्थ्यांपैकी 0.3%, सोडून दिलेल्या महिला 0.2% आणि निराधार महिला 0.1% आहेत. 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे एकूण लाभार्थ्यांपैकी 29% होती. त्यानंतर 21-29 वयोगटातील गट 25.5% होता तर 40-49 वयोगटातील गट लाभार्थ्यांपैकी 23.6% होता. खरंच, 78% लाभार्थी 21-39 वयोगटातील होते आणि 22% लाभार्थी 50-65 वयोगटातील होते. 60-65 वयोगटातील लाभार्थींचा वाटा जवळजवळ 5% होता. "60-65 वयोगटातील जवळजवळ 5% महिलांना लाभ मिळाला आहे.