Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana Latest Update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत 2 कोटी 54 लाख महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा लाभ येत्या 8 मार्चला खात्यात जमा होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानपरिषदेत दिली. याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनिल परब यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या योजनेचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर एकाही निकषात बदल केलेला नाही असं आदिती तटकरे यांनी सांगितलं. जुलै महिन्यापासूनच या योजने अंतर्गत छाननी प्रक्रिया सुरू झाली. संबंधित विभागाकडून इतर योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी जसजशी प्राप्त होत गेली त्यानंतर छाननी होत गेली.
दरम्यान अपात्र लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले असं महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या महिलांना 65 वर्ष पूर्ण झाली आहेत त्या आपोआपच या योजनेतून अपात्र होणार आहेत. तसेच काही महिला विवाह करून दुसऱ्या राज्यात गेल्या त्या महिला अपात्र ठरल्या असं आदिती तटकरे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे बनावट खाती वापरून ज्यांनी नोंदणी केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यावर कारवाई करण्यात आली असं अदिती तटकरे यांनी सांगितलं.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
कोणत्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही तसेच महिलांकडून लाभ परत घेण्याची कोणतीही भूमिका शासनाची भूमिका नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. महायुतीच्या जाहिरनाम्यात 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं ते कधी देणार अशी विचारणा विरोधकांनी या चर्चेत केली. त्यावर उत्तर देताना आदिती तटकरे यांनी जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो त्यामुळे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री जेव्हा प्रस्तावित करतील तेव्हापासून लाडक्या बहिणींना विभागाकडून हा लाभ देण्यात येईल असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.
त्यामुळे लाडकी बहीण योजनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 2100 रुपये देणार असल्याची घोषणा आम्ही केलेली नाही. असं वक्तव्य आदिती तटकरे यांनी केलं आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची निराशा होण्याची शक्यता आहे.