Maharashtra legislature: सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारचं तिसरं विधीमंडळ अधिवेशन सध्या सुरु आहे. मात्र लोकशाहीचा मुख्य आधार असलेल्या विरोधी पक्षनेत्याचीच अजूनपर्यंत निवड करण्यात आलेली नाही. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्याचाच दुसरा अध्याय म्हणजे विरोधी पक्षांनी थेट सरन्यायाधीशांकडेच याबाबतची तक्रार केली.
विरोधी पक्षनेत्याची निवड करावी यासाठी विरोधकांना विधिमंडळाच्या पाय-यांवर बसून आंदोलन करण्याची वेळ आलीय. महायुती सरकार दुस-यांदा सत्तेत आल्यापासून हे तिसरं अधिवेशन आहे. विधानसभा अध्यक्षांनी अजूनही विरोधी पक्षनेत्याची निवड केलेली नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडं 10 टक्के आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. पण विरोधातल्या कोणत्याच पक्षाकडं तेवढी सदस्यसंख्या नसल्यानं अजूनही विरोधी पक्षनेतेपदी कोणाचीही निवड झालेली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा करुनही अध्यक्ष विरोधी पक्षनेत्याची निवड करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यावर भास्कर जाधवांनी सभागृहात विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीचा मुद्दा उपस्थित केला. सरन्यायाधिश विधिमंडळात येत असताना त्यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेता नाही असा मुद्दाही त्यांनी मांडला.शिवाय दहा टक्के सदस्यसंख्येचा मुद्दाही गैरलागू असल्याचा दावा जाधवांनी केला.
यावेळी अध्यक्ष आणि भास्कर जाधवांमध्ये बरीच तू तू मै मै झाली. शेवटी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत सरन्यायाधीश सभागृहात येत असल्यानं या विषयावर नंतर बोलू असं सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.
विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवर यापूर्वी दालनात चर्चा केलीय. मग सभागृहात हा विषय का उपस्थित केला असा सवाल करत विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.विरोधी पक्षांनी सरन्यायाधिश भूषण गवई यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेता निवडीत जाणिवपूर्वक उशीर केला जात असल्याची तक्रार केली.
विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव अगदी निर्वाणीवर आलेत. विरोधी पक्षनेतेपद मिळत नसल्यानं ते नाराज होते. त्यांच्या मनात स्वकियांविषयीच शंका होती. पण आज विरोधकांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी जे आंदोलन केलं. सरन्यायाधिशांची भेट घेऊन त्य़ांच्याकडं तक्रार केली. यावरुन विरोधी पक्षनेतेपद जाधवांना मिळावं यासाठी विरोधकांत एकमत आहे असा किमान अर्थ तरी काढला जाऊ शकतो. विरोधी पक्षनेतेपद मिळो अथवा न मिळो पण भास्कर जाधवांसोबत पक्ष आणि मित्रपक्ष आहेत हे तरी या निमित्तानं अधोरेखित झालंय.
महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन महिन्यात पालिका निवडणुकींचं बिगुल वाजणारय.. त्यामुळे सर्वच पक्षाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरूय. मराठीच्या मुद्द्यावरून एकीकडे 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत. पालिका निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुती देखील अलर्ट मोडवर आलीय. ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीकडून मिशन महापौरची घोषणा करण्यात आलीय, मुंबईतील विविध समुदायाची टक्केवारीनुसार महायुतीच्या निवडणुकीचा फॉर्म्युला ठरणार असल्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पालिका निवडणुकीत मराठी-अमराठी असं ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यापासून महायुती उमेदवारांसाठी सर्व्हे करणार असल्याची माहिती आहे. भाजपकडे अमराठी मतांची जबाबदारी असल्याची माहिती आहे. दादांच्या राष्ट्रवादीकडे बहुजन मतांची जबाबदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिंदेंच्या शिवसेनेकडे मराठी मतं वळवण्याची जबाबदारी देण्यात आलीय.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत राज्य सरकारला काही सवाल केले आहेत. त्यामुळे मराठी आणि अमराठी असा मुद्दा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापण्याची शक्यता आहे. मात्र, याच मुद्द्यावरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंतांनी भाजपर निशाणा साधलाय. भाजपला राज्यात हिंदी-मराठीचं नरेटिव्ह सेट करायचाय असा आरोप सावंत यांनी केलाय.मागील अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा होता. दरम्यान शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवरची सत्ता भाजपला उलथवून लावायची आहे. त्यामुळे महायुतीकडून मुंबई पालिकेसाठी मिशन महापौर राबवण्यात येतंय. त्यामुळे महायुतीचा या मिशनचा किती फायदा होणार? हे पालिका निवडणुकीनंतरच समोर येणार आहे.