Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बालेकिल्ल्यात सगळेच मित्रांनाही दाखवणार ताकद! महायुतीतले पक्ष 'हे' एक शहर वगळता सगळीकडे एकटेच लढणार?

Maharashtra Local Body Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षांनी पार पडत असून त्यापूर्वीच महायुतीमध्ये एकला चलोची भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बालेकिल्ल्यात सगळेच मित्रांनाही दाखवणार ताकद! महायुतीतले पक्ष 'हे' एक शहर वगळता सगळीकडे एकटेच लढणार?

Local Body Election 2025 Maharashtra: महाराष्ट्रामध्ये मागील अनेक वर्षांपासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील घोषणा कधीही होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्यासंदर्भातील निर्देश जारी केल्याने निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींपेक्षा फार वेगळ्या असणार आहेत. यामागील कारण म्हणजे मागील तीन ते चार वर्षात महाराष्ट्रातील राजकारणात झालेली उलथापालथ अभूतपूर्व आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे दोन मोठे पक्ष फुटून त्यांचे चार पक्ष झाले आहेत. सध्या राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय संघर्ष दिसत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच आघाडीतील पक्ष आणि महायुतीचे पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. असं असतानाच आता सत्ताधारी महायुतीमध्ये या निवडणुकीपुरती फूट पडण्याची चिन्हं दिसत आहेत. 

बालेकिल्ल्यांमध्ये एकमेकांविरोधात

आतापर्यंत अनेकदा महायुतीमधील घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांनी महायुती एकत्रच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवेल असा दावा केला जात होता. मात्र आता मुंबई महानगरपालिका वगळता महायुतीमधील पक्ष एकत्र लढणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये आणि अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार असल्याचं सांगितला जात आहे. त्याचप्रमाणे राज्यभरामध्येही अगदी जिल्हा परिषदांपासून इतरही निवडणुकांमध्ये महायुतीचे पक्ष वेगवेगळे लढतील अशी जोरदार चर्चा आहे. या वृत्ताला सूत्रांनी दुजोरा दिलाय. 

भाजपालाच स्वबळावर लढायचंय

मुंबई वगळता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये हे तिन्ही मित्रपक्ष एकमेकांविरोधात उमेदवार देणार आहेत. मुंबई वगळता सगळीकडे स्वबळावर लढण्याचा भाजपाचा मानस आहे. 

निवडणुका कधी?

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.  तीन टप्प्यात या निवडणुका होणार असल्याचं सांगितला जात आहे. जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महापालिका अशा टप्प्यात निवडणुका होतील. महापालिका निवडणुका शेवटी होणार आहेत. महापालिका निवडणुकांमध्येही मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कोण बाजी मारतं याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं असेल.

मुंबईमध्ये दोन्ही सेना एकत्र?

मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती एकत्र लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. त्यातही ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र लढणार का याबद्दलचा सस्पेन्सही कायम आहे. या दोन्ही सेना एकत्र लढल्या तर मराठी मतांवर परिणाम होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read More