चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, लोणावळा : (Lonavla Monsoon Tourism) पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबई, पुण्याकडील अनेकांचेच पाय नजीकच्या काही पर्यटनस्थळांकडे वळतात. त्यामध्ये अनेकांच्याच आवडीचं आणि प्राधान्यस्थानी असणारं ठिकाण म्हणजे लोणावळा. घाटवाटांमधून या गिरीस्थानावर गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी होताना दिसत असून, यंदाचा पावसाळासुद्धा इथं अपवाद ठरलेला नाही. मात्र या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लोणावळ्यावला जाऊन तिथं कोसळणाऱ्या पावसाच्या माहोलात गरमागरम वडापावचा आस्वाद घेणाऱ्यांसाठी हा सावधगिरीचा इशारा.
लोणावळ्यात पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, हे सांगणारी काही दृश्य नुकतीच समोर आली आहेत. जिथं, बटाटावड्याच्या भाजीत नासके, खराब झालेले बटाटे वापरले जात असल्याचं सजग नागरिकांना दिसताच, त्यांनी विक्रेत्यांना लगेचच जाब विचारल्याचं पाहायला मिळालं.
12 जुलै रोजी हा किळसवाणा प्रकार पर्यटकांनी व्हिडिओ काढत समोर आणला. लोणावळा शहरातल्या मुख्य बाजारपेठेत परमार रूग्णालयासमोर चौकात या दुकानात वडापाव आणि भजी बनवण्यासाठी कुजलेले आणि उंदरानं अर्धवट खाल्लेले बटाटे वापरले जात होते. इतकंच नाही, तर भजी आणि वड्याचं पीठ तयार करताना त्यात अत्यंत अस्वच्छ पाणी वापरलं जात होतं. याचा व्हिडिओ काढत नागरिकानं पोलिसांकडेही तक्रार केली. शनिवारी 112 या पोलीस हेल्पलाईनवर ही तक्रार नोंदवण्यात आली. मात्र पोलीस पोहोचले तेव्हा दुकानाचा मुख्य आचारी पळून गेल्याची बाब समोर आली असून आता त्याचा तपास केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं लोणावळ्यात किंवा इतर कुठंही पावसाच्या दिवसांमध्ये रस्त्यावर, दुकानांमध्ये विकले जाणारे खाद्यपदार्थ विकत घेताना त्यांच्या स्वच्छतेवरही लक्ष ठेवा.
पावसाळी दिवसांमध्ये अनेकदा वातावरणातील गारठा, ओलावा यांमुळं काही साथीचे आजार फोफावतात. ज्यामुळं आरोग्य विभागाकडूनही उघड्यावरील अन्नपदार्थ खाण्यासंदर्भाक नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात येतो. त्यातही पर्यटनाच्या निमित्तानं गेलं असता तुमच्यापुढ्यात दिला जाणारा पदार्थ किमान चांगल्या गोष्टींपासून तयार करण्यात आला आहे यावर लक्ष देण्याच्या सूचनासुद्धा नागरिकांना दिल्या जात आहेत.