Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कष्टाचं 'सार्थक' झालं! ऊसतोड मुलाच्या हातून उमटले अक्षराचे मोती

आई-वडिल ऊसतोडणीसाठी पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यावर, मुलाने हस्ताक्षर स्पर्धेत घेतला भाग आणि सोशल मीडियावर झाला व्हायरल

कष्टाचं 'सार्थक' झालं! ऊसतोड मुलाच्या हातून उमटले अक्षराचे मोती

अहमदनगर : ऊसतोड कामगारांच्या व्यथा आपण ऐकत असतो, बघत असतो. थंडी, ऊन, वाऱ्याची तमा न बाळगता ऊस तोडणी कामगार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आप्लया मुलाबाळांसह आपला प्रपंच पाठिवर घेऊन ऊसाच्या तोडणी दाखल होतात. खानदेश, धुळे, बीड, जालना, पाथर्डी, चाळीसगाव तसंच नगर जिल्ह्यात अनेक ऊसतोड कामगार आहेत. पहाटे उठून ऊसतोडीसाठी जायचं, सोबत पत्नी आणि लहान घ्यायची. आपली मुलं शिकून मोठी व्हावीत, त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं हे त्यांच्या गावीही नसतं. लेकरा-बाळांना सांभाळायला कुणी नसल्याने मुलंही आपल्या आई-बाबांबरोबर ऊसतोडीसाठी जातात. 

अनेक ठिकामी शाळेची पर्यायी व्यवस्था नसल्याने मुलांचं शिक्षण होत नाही. आई-बाबांना मदत होईल आणि जास्तीचे दोन पैसे मिळतील या आशेने अगदी लहान वयातंच ऊसतोड कामगारांची मुलं ऊसतोडीच्या मजूरीसाठी जुंपली जातात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका ऊसतोज कामगाराच्या मुलाची जोरदार चर्चा आहे. पण त्याच्या मजूरीसाठी नाही तर त्याच्या हातून वहीवर कोरल्या गेलेल्या मोत्यासारख्या अक्षरामुळे. या मुलाचं कोरीव हस्ताक्षर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कोण आहे तो मुलगा?
सार्थक बटुळे असं या मुलाचं नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तो राहतो, आणि इथल्याच भारजवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथी वर्गात तो शिक्षण घेतो. त्याच्या सुंदर आणि कोरीव हस्ताक्षराची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील हस्ताक्षर स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. 

आई-बाबा ऊसतोड मजूर

सार्थकचे आई-बाबा ऊसतोड मजूर आहेत. ऊसतोडीच्या हंगामात ते आपल्या मुलाला शिक्षणासाठी घरी ठेवून ऊसतोडणीच्या कामासाठी दुसऱ्या गावात जातात. यंदाही ते ऊसतोडीसाठी दुसऱ्या गावात गेले आहेत. आपल्या आई-बाबांच्या कष्टाचे त्याने आपल्या नावाप्रमाणेच सार्थक केलं आहे. 

सार्थकवर कौतुकचा वर्षाव
कॉम्प्युटवर टाईप करावं असं सार्थकचं अक्षर आहे. त्याच्या वळणदार अक्षराने सर्वांना भूरळ घातली आहे. सार्थकने नगर जिल्ह्यातील हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सार्थकने शेरास सव्वाशेर या विषयावर एक निबंध लिहिला. त्याने लिहिलेल्या निबंधाचं कौतुक तर झालंच, पण सर्वजण त्याच्या हस्ताक्षराच्या प्रेमात पडले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सार्थकचं कौतुक केलं आहे. 

या शाळेतील ऐंशी टक्के विद्यार्थ्यांचे आई-वडिल ऊसतोड कामगार असून ऊसतोडीसाठी ते राज्यातील वेगेवगळ्या भागात जातात. या मुलांचा सांभाळ त्यांचे आजी-आजोबा करतात. 

Read More