Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रातील पाणीप्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे आश्वासन, विरोधकांचे आरोप; कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार?

राज्यात उष्णता वाढलीय परिणामी पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानं जलसाठ्यात घट होऊ लागलीय. एकीकडे राज्यातल्या जनतेला पाणीटंचाईचे चटके बसत आहेत तर दुसरीकडे राजकारणी नेतेमंडळी आरोप प्रत्यारोप करत आहेत.

महाराष्ट्रातील पाणीप्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे आश्वासन, विरोधकांचे आरोप; कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार?

Water Issue: राज्यात उष्णता वाढलीय परिणामी पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानं जलसाठ्यात घट होऊ लागलीय. एकीकडे राज्यातल्या जनतेला पाणीटंचाईचे चटके बसत आहेत तर दुसरीकडे राजकारणी नेतेमंडळी आरोप प्रत्यारोप करत आहेत.

राज्यात वाढती उष्णता पाणीटंचाईला कारणीभूत ठरतेय.. बाष्पीभवन वाढल्यानं जलसाठे आटू लागलेत.. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची कमतरता भासू लागलीय.. प्यायला तर पाणी विकत घ्यावं लागतंच पण अंघोळीसाठीही पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आलीय. टँकरची मागणी वाढलीय. माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांसाठीही पाणी लागतं त्याची सोय करायची कशी असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय.. तर दुसरीकडे सरकार दरबारी उपाययोजना सुरू असल्याचं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

मंत्र्यांनी आश्वासन दिलं असलं तरी पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर घणाघात केलाय. सरकारमध्ये टँकर माफियाचे सूत्रधार असल्याचा मोठा आरोप त्यांनी केलाय. 

राज्यात जलजीवन मिशन योजनेवर करोडो रूपये खर्चून ग्रामस्थांना पाणी कसं मिळत नाही, असा प्रश्न करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी शंका उपस्थित केलीय.
 
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना गाठून पत्रकारांनी पाणीटंचाईचा प्रश्न विचारला. यावेळी एप्रिल, मे महिन्यात राज्यात पाणीटंचाई निर्माण होते. या अडचणीतून सरकार मार्ग काढेल, असं आश्वासन फडणवीसांनी दिलं.
पाणीटंचाईचा मुद्दा जनतेला नवा नाही पण दरवर्षी बिकट बनत चाललेल्या या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार याचीच प्रतीक्षा राज्यातली जनता करतेय.

राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. त्यामुळं गावागावात टॅंकरनं पाणीपुरवठा केला जात असल्याचं चित्र आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 1 हजार 384 गावं आणि वाड्यांवर 478 टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत.गेल्या आठवड्यात हा आकडा 223 होता, मात्र आठवडाभरात हा आकडा अडीचशेपेक्षा जास्त झालाय. सध्याच्या परिस्थितीला अर्ध्या महाराष्ट्राची तहान टँकरवर भागवण्याची वेळ आलीय.

कोणत्या जिल्ह्यात किती टॅंकर?

- ठाणे- 36 टँकर
- रायगड -21 टँकर
- पालघर- 17 टँकर
- नाशिक- 22 टँकर
- अहिल्यानगर- 56 टँकर
- पुणे- 31 टँकर
- सातारा- 55 टँकर
- सांगली- 02 टँकर
- सोलापूर- 05 टँकर
- छत्रपती संभाजीनगर- 135 टँकर
- जालना- 46 टँकर
- नांदेड- 02 टँकर
- अमरावती- 12 टँकर
- वाशिम- 01
- बुलढाणा- 28 टँकर
- यवतमाळ- 08 टँकर

उन्हाचा पारा वाढत असल्यानं अनेक छोट्या-मोठ्या तलावांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत आहे. तर ग्रामीण भागांमधील विहिरी आणि बोरवेलचं पाणीदेखील आटलंय.त्यामुळं अनेक भागात पिण्यासाठी पाणीच नसल्यानं टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतोय.अजून एप्रिल महिना संपायचा बाकी आहे. मे महिन्यात हे पाणीसंकट आणखी रौद्ररुप धारण करू शकतं. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना होणं आवश्यक आहे.

Read More