जेलमधून सुटल्यावर आरोपींची मिरवणूक काढून केलेलं सेलिब्रेशन उल्हासनगरातल्या गुंडांना महागात पडलं. या आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांची ज्या भागात मिरवणूक काढली होती. त्याच भागात त्यांची धिंड काढली.
माज दाखवणा-या गुंडांची मस्ती कशी उतरायची, हे पोलिसांना चांगलं ठाऊक असतं.. हे तेच दादा लोक आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी जामीनावर सुटताच दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याच दादांना पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवला. उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरात दारूच्या नशेत वाद झाला. त्यातून एकाला लोखंडी तलवार आणि रॉडनं मारहाणही झाली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या दिवाकर यादवसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. मात्र दिवाकर यादवला जामीन मिळाला. पण शेवटी गुन्हेगारच.. बाहेर येताच दहशत माजवण्याचा त्यानं प्रयत्न केला. त्याच्या समर्थकांनी फटाके फोडले, ढोलताशे वाजवले आणि मिरवणूक काढली.
हल्ली गल्लोगल्ली सीसीटीव्ही असतात. त्यात त्याचे आणि त्याच्या समर्थकांचे प्रताप, मस्ती सारं काही सीसीटीव्ही कॅमे-यात चित्रित झालं. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सर्वच स्तरातून यावर जोरदार टीका झाली. गुन्हेगारांचं उदातीकरण होतंय का ? असे सवाल विचारले गेले.झी 24 तासनं ही बातमी लावून धरली. आता प्रश्न प्रतिष्ठेचाही बनला आणि गुन्हेगारांना अद्दलही घडवायची होतीच, त्यामुळे पोलिसांनी मिरवणुकीतल्या दिवाकर यादवसह इतर काही जणांवर गुन्हा दाखल तर केलाच आणि बेड्याही ठोकल्या. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्याच ठिकाणी या दहशत माजवणाऱ्या दादांना पोलिसांनी नेलं आणि त्यांची धिंड काढली.
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी त्यांना हिसका दाखवणं आवश्यक असतं. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि सामान्यांचा त्रास वाढत राहिल..