Maharashtra Political News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (BMC Election 2025) तोंडावर आलेल्या असतानाच आता अनेक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांचे स्थानिक नेत्यांशी होणारे संवाद आणि एकंदर पक्षाची घडी बसवण्याचे प्रयत्न महायुतीत सुरू असतानाच, तिथं ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
(Shivsena) शिवसेना UBT पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि (MNS) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राजकीय दुरावा मिटवत काही दिवसांपूर्वीच एका विजयी मेळाव्यादरम्यान एकत्र येत मराठी जनांची मनं जिंकली. तत्पूर्वीपासूनच ठाकरेंचे पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्याच चर्चांना आता पुन्हा एकदा ठाकरे बंधुंच्या आणखी एका भेटीमुळं बळकटी मिळाली असून, (Mahayuti) महायुतीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत काही महत्त्वाच्या निकषांवर तयारी केल्याचं स्पष्ट होत आहे.
(Raj Thackeray, Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीविरोधात महायुतीचा प्लान बी नुकताच समोर आला आहे. जिथं महायुती कोणताही धोका पत्करण्याच्या तयारीत नसून, त्याचसाठी आता रणनिती धुरंधरांकडून प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीच्या अनुषंगानं विचार केला जात असल्याचं स्पष्ट होत आहे.
ठाकरेंच्या युतीविरोधात महायुतीचे 'नो रिस्क' धोरण असल्याची माहिती समोर आली आहे. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महायुतीने एक आराखडा तयार केला असून, यामध्ये जिथं वाद असतील ते वाद येत्या महिन्याभरात मिटवून निवडणुकीच्या तयारीला महायुती सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे.
BMC Election चं महत्त्वं लक्षात घेता मुंबईतील प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतीतील आमदारांकडे देण्यात येणार असल्याचं कळत आहे. महत्त्वाचं म्हणजे आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता त्याचदरम्यान सामान्य मतदारांच्या नजरेच भरेल असं आणि स्मरणात राहील असं काम करण्यावर महायुती भर देत असून, सणवारांवर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे.
मतदारांचे ठराविक गट केंद्रीत करत त्यांच्या दृष्टीनं अतीव महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांवर आणि समस्यावर महायुती काम करणार असून, टप्प्याटप्प्यानं कृती केली जाईल. ज्यामध्ये कोकणी मतदारांसाठी महायुतीनं गणेशोत्सवावर लक्ष केंद्रीत केलं आहे. गणेशोत्सवासाठी मोफत रेल्वे सुविधा, एसटी बसची व्यवस्था महायुती करणार असून, त्यासोबतच गोविंदा पथक, गणेशोत्सव मंडळांना जोडण्याचा महायुतीचा मनसुबा असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं सणउत्सवांच्या या काळात उत्साही वातावरणाला राजकारणाची किनारही असणार असं म्हणणं गैर ठरणार नाही.