Maharashtra Politics: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भाषणामधील एका विधानावरुन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. 21 जून रोजी 11 व्या अंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना अमृता यांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना थेट उद्धव यांचा उल्लेख न करता अमृता यांनी उत्तर दिलं.
19 जूनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना एक भाषण केलं. या भाषणामध्ये त्यांनी एक जुना संदर्भ देत आपण गद्दासामोर उभे असून त्यांना थेट आव्हान देतोय असं विधान केलं. "मी तयारीने उभा आहे. तुमची तयारी काय आहे मला कल्पना नाही. 92-93 साली दंगा भडकला होता तेव्हा तुम्ही सगळे शिवसैनिक छातीचा कोट करुन रस्त्यावर उतरला होता. मुंबई वाचवली होती. तेव्हा एक व्यक्ती बाळासाहेबांकडे आली होती. बाळासाहेब बसं झालं, बाळासाहेब पुरं झालं. कोण ती व्यक्ती ते सांगत नाही मी आता. ती आहे हयात. बाळासाहेबांनी सांगितलं की एक पिक्चर मी पाहिला, 'प्रहार' नावाचा! नाना पाटेकरांचा. त्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि म्हणतो, 'कम ऑन किल मी!' तसा मी या गद्दारांसमोर उभा आहे आणि सांगतोय, 'कम ऑन किल मी!' असं विधान उद्धव ठाकरेंनी भाषणात केलं होतं. उद्धव यांच्या या विधानानंतर सभागृहामध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट शिवसैनिकांनी केलेला.
उद्धव यांनी केलेल्या भाषणात उल्लेख केलेल्या 'कम ऑन किल मी!' या विधानावरुन अमृता फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रश्न ऐकल्यानंतर अमृता फडणवीस यांनी शांततेचं महत्त्व सांगत भारत शांतताप्रिय देश असल्याचं म्हटलं. "अंतरराष्ट्रीय योग दिन आहे. योग काय सांगतं? योग हे शांतीचं प्रतिक आहे. प्रत्येक माणूस किंवा संस्था असित्त्वात असते. आपल्याला असा विचार करायची गरज नाही की आपल्याला कोणी मारेल किंवा ठार करेल. हा शांतीप्रिय देश आहे. शांतीपूर्ण पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. सर्वजण लोकांच्या भल्यासाठी सहकार्याने राहतील," असं अमृता फडणवीस म्हणाल्या. सर्व राजकीय पक्षांमध्येही तितकिशी कटूता नाही. त्यामुळे एवढा विचार करू नये, असा सल्लाही अमृता यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
नक्की वाचा >> Raj-Uddhav Alliance: भावासाठी 'मविआ'ला तिलांजली? उद्धव घेणार मोठा निर्णय; 'त्या' विधानाने चर्चांना उधाण
अमृता फडणवीस यांनी 11 वा अंतरराष्ट्रीय योग दिन मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या योग साधनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. "देवेंद्रजी योगीच आहेत. ते कसरत कधीच नाही करत, पण ध्यान धारणा करतात," असं अमृता म्हणाल्या.