Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून... सामनातून शिंदे सरकारवर गंभीर आरोप तर उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

Maharashtra Politics : सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे यासारख्या राजकीय विरोधकांच्या अपघातांचा उल्लेख करत यामुळे अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून... सामनातून शिंदे सरकारवर गंभीर आरोप तर उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण्यांच्या अपघातांचे सत्र सुरुच आहे. आमदार विनायक मेटे (vinayak mete) यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर अनेक नेत्यांचे गंभीर अपघात झालेत. शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार योगेश कदम यांचा काही दिवसांपूर्वीच अपघात झाला होता. त्यानंतर गेल्याच आठवड्यात एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीने पेट घेतला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील त्यांच्यासोबत घडलेल्या एका गंभीर अपघाताची माहिती दिली होती. याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात आलीय. सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे यासारख्या राजकीय विरोधकांच्या अपघातांचा उल्लेख करत यामुळे अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या स्थैर्यासाठी रेड्याचा बळी

महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरुद्ध नेहमीच लढा दिला. जादूटोणा वगैरे अंधश्रद्धेस मूठमाती देण्यासाठी सरकारने कायदा केला, पण महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे व सध्या याच विषयांची चर्चा मंत्रालयात व इतर सरकारी कार्यालयांत होत असते. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाचे चाळीस आमदार हे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या मंदिरात गेले. तेथे त्यांनी जादूटोण्याचे विधी केले, रेडा बळी दिल्याचे बोलले जाते. हे बळी म्हणे मुख्यमंत्रीपदाच्या स्थैर्यासाठी दिले. पुन्हा हे लोक त्याच मंदिरात नवस फेडण्यासाठी जाऊन आले. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. या राज्यात जादूटोणा, सरकारी बंगल्यावरील मिरची यज्ञ वगैरे अघोरी प्रथांना स्थान नाही, पण शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. याचा संबंध लोक सरकारपुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते बरे नाही, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.

राजकीय विरोधकांच्या अपघातांची मालिका

पुणे शहरातील एका कार्यक्रमादरम्यान दीपप्रज्वलनाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. उपस्थितांच्या लक्षात हा प्रकार आल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचदरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे एका विचित्र लिफ्ट अपघातातून बालबाल बचावले. पवार हे तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जायला निघाले. मध्येच वीज गेली आणि चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या आधीच लिफ्ट धाडकन खाली कोसळली.  पवार म्हणतात, मी मोठ्या अपघातातून वाचलो, नाहीतर श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती. अजितदादा हे पुरोगामी विचारांचे आहेत, पण त्यांचे लोक म्हणतात की, काहीतरी गडबड आहे! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे नागपूर अधिवेशनाच्या वेळी अपघातात जखमी झाले व त्यांचा उजवा खांदा निखळल्याने ते आजही सक्रिय नाहीत. विरोधकांचा बुलंद आवाज धनंजय मुंडे यांना त्यांच्याच बीड जिल्ह्यात मोठा अपघात झाला. त्यांची कार चक्काचूर झाली. मुंडे थोडक्यात बचावले, पण त्यांच्या छातीच्या बरगड्या तुटल्याने ते इस्पितळात खाटेला खिळून आहेत. शिवसेनेचे संजय राऊत यांनाही नाहक तुरुंगात जावे लागले ते याच राजकीय जादूटोण्यामुळे. विनायक मेटे यांनाही अपघाती मरण आले. ते गेल्या काही काळापासून भाजपच्या विरोधात बोलू लागले होते. विरोधकांना अशा प्रकारे इस्पितळांच्या खाटांवर खिळवून ठेवणारी ही मालिका काय सांगते? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.

अघोरी प्रयोगांचे फटके महाराष्ट्राच्या जनमानसाला

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’वरील अखेरच्या काळात भयंकर आजारास सामोरे जावे लागले. त्यांच्यावर अचानक अवघड व जीवघेण्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यामुळे काही काळ ते अत्यवस्थ झाले होते आणि त्याच वेळी महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे प्रयोग सुरू झाले. म्हणजे महाराष्ट्रातील ‘करणी टोळी’चे अघोरी प्रयोग हे आधीपासूनच सुरू होते. या अघोरी प्रयोगांचे फटके महाराष्ट्राच्या जनमानसाला बसत आहेत. ही एक प्रकारे अंधश्रद्धा असली तरी लोकांच्या मनात या अंधश्रद्धा घट्ट रुजत आहेत हे काही बरे नाही. महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख लोकांवर अपघात, घातपात, चौकश्यांची संकटे एकापाठोपाठ कोसळत आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे

"राज्याचे मुख्यमंत्री कुठे दौऱ्यावर गेले की, ते एखादा ज्योतिषी अथवा तंत्रविद्येच्या अभ्यासकाच्या खास भेटीगाठी घेतात हे काही लपून राहिलेले नाही. ही महाराष्ट्राची प्रगती नसून अधोगती आहे. कामाख्या देवीला रेडय़ाचा बळी देऊन सरकार आणले ही धारणा फुटलेल्या चाळीस आमदारांची आहे. रेड्याचा बळी दिला नाही हे मुख्यमंत्री व त्यांच्या लोकांनी कामाख्या देवीच्या शपथेवर सांगावे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना अपघात व घातपाताची नाट लागली. त्याचा संबंध या रेडा बळीशी आहे काय, तेसुद्धा लोकांसमोर येऊ द्या. जादूटोणा, लिंबू-मिरची, टाचण्या, काळय़ा बाहुल्या, रेडा बळी ही काही महाराष्ट्र राज्याची ओळख असता कामा नये. तशी ती होताना दिसत आहे. मागे एकदा मुख्यमंत्री महोदय हे नागपुरातील रेशीम बागेतील संघ मुख्यालयात गेले. त्यावेळी लोकांनी त्यांची गंमत केली. ‘‘सरसंघचालकांनी सावधानता बाळगावी. मुख्यमंत्री येऊन गेलेत. संघ मुख्यालयातील कोपऱ्यात सुया, टाचण्या, लिंबू वगैरे पडले आहेत का तपासा!’’ असा सध्या चेष्टेचा विषय झाला आहे खरा. महाराष्ट्रात राजकीय विरोधकांचे जे अपघात होत आहेत यामुळे त्या अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली आहे. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे," असाही सल्ला सामना अग्रलेखातून देण्यात आलाय.

Read More