Maharashtra Political News : राष्ट्रवादीमध्ये दुफळी माजली, पक्षाचे दोन भाग झाले. अनेक नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ स्वीकारली, तर काही नेते शरद पवार यांच्याच पक्षासोबत राहिले. भाकरी फिरवण्याचं हे राजकारण दर दिवशी नवी वळणं घेताना दिसलं आणि आता त्याल आणखी एका नव्या वळणाची भर पडताना दिसत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम काही महिन्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता असतानाच आता पुन्हा एकदा बहुचर्चित काका- पुतण्याची जोडी पुन्हा एकत्र येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
एकजुटीच्या या चर्चांना आता पुन्हा खतपाणी मिळालं आहे ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळं. नुकतंच पत्रकारांशी संवाद साधताना पटेल यांनी राष्ट्रवादीच्या या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणासंदर्भात सांकेतिक प्रतिक्रिया दिली.
'असे महत्त्वाचे निर्णय माध्यमांसमोर घेतले जात नाहीत' असं म्हणत सध्या देशापुढे अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि मुद्दे असून भारत- पाकिस्तानातील तणावपूर्ण स्थितीकडे त्यांनी आपला रोख वळवला. या संपूर्ण स्थितीत आपण राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार की नाही, याबाबतच्या चर्चांना वाव देणं योग्य नसेल. मुळात हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नाही असं सांगत या क्षणी देशात एकजुट राहणं गरजेचं असेल असं पटेल म्हणाले.
संजय राऊतांनी शस्त्रसंधीचा उल्लेख करताना केलेल्या वक्तव्यावर व्यक्त होताना ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण कळत नाही, देशाचं हित कशात आहे हे लक्षात येत नाही अशा 'चिल्लर' लोकांबद्दल आणि अशा 'चिल्लर' राजकारणाबद्दल काहीही बोलणं आपल्याया योग्य वाटत नसल्याचं म्हणत पटेल यांनी राऊतांवर ही संधी पाहून निशाणा साधला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि पवार कुटुंब याच मुद्द्यांभोवती राज्याचं राजकारण फिरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकिकडे सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र येण्याची शक्यता काही दिग्गजांनी व्यक्त केली आहे, तर रोहित पवारसुद्धा अशाच आशयाचा सूर आळवताना दिसत आहेत. किंबहुना अजित पवार गटाच्या काही नेत्यांनीसुद्धा त्यांचा पक्ष आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंदच असेल अशी प्रतिक्रिया दिल्यानं आता या राजकीय खेळीचा निकाल नेमका कसा लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.