Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुतण्याला काकाची काळजी, अजितकाका पक्षात एकटे पडल्याचा रोहित पवारांचा आरोप

अजित पवार हे राष्ट्रवादीत एकाकी असल्याचा साक्षात्कार रोहित पवारांना झाला आहे.

पुतण्याला काकाची काळजी, अजितकाका पक्षात एकटे पडल्याचा रोहित पवारांचा आरोप

Rohit Pawar On Ajit Pawar : बरोबर एक वर्षापूर्वी अजित पवार आणि रोहित पवार हे काका पुतणे एकमेकांना पाण्यात पाहत होते. पण गेल्या वर्षभरातल्या राजकीय घडामोडींमुळं आता अजितकाकांबाबत पुतणे रोहित पवारांना भलतंच ममत्व आलं आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीत एकाकी असल्याचा साक्षात्कार रोहित पवारांना झाला आहे.

रोहितदादांना अजितकाकांची काळजी

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. अजित पवार यांच्यावर रोहित पवार यांनी जाहीर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यावर टीकेची धार वाढली होती. अजितदादांवर तुफान टीका करणाऱ्या रोहित पवार यांना आता मात्र त्यांची खूपच काळजी वाटू लागली आहे. त्याच काळजीपोटी अजितदादा पक्षात कसे एकटे पडलेत हे आता रोहित पवार सांगू लागले आहेत.

अजितदादांची बाजू मांडण्यासाठी पवार कुटुंबातला कोण पुढाकार घेणार आहे का असा खोचक सवाल रोहित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी जय पवार आणि सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांची बाजू मांडावी असं सांगून स्वतःची सुटका करवून घेतली.

अजितकाकांचा पुतण्याला पुळका

अजित पवार राष्ट्रवादीत किती एकटे आहेत हे सांगताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादीत नेत्यांची दुसरी आणि तिसरी फळीच शिल्लक नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे येत्या ग्रामपंचायत निवडणुकीचं नियोजनही अजितदादांना पाहावं लागेल असं रोहित काळजीपोटी म्हणालेत. तर रोहित पवार यांना अजितदादांबाबत वाटत असलेल्या काळजीबाबत राष्ट्रवादीनं अनपेक्षित उत्तर दिलं आहे. अजितदादांबाबत एवढी काळजी वाटत असेल तर त्यांनी अजितदादांच्या छत्रछायेखाली यावं अशी अनपेक्षित ऑफर दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांना अजित पवारांबाबत भलतंच ममत्व वाटू लागलं आहे. सत्तेच्या सावलीसाठी ही माया-ममता आहे हे लपून राहिलेलं नाही. आगामी काळातल्या मनोमिलनाची ही नांदी तर नाही ना अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

Read More