Maharashtra Rain News : जून महिन्याच्या अखेरपासूनच पावसानं चांगला जोर धरला आणि बहुतांश भागांमध्ये तो अनेकांना आनंद देत बरसला. अर्थात राज्याचा काही भाग मात्र या पावसापासून अद्यापही वंचितच आहे. कारण, तिथं पावसाचं आगमन तर झालं, पण अजूनही काळ्या ढगांचं चकवा देणं इथं सुरुच आहे. राज्याच्या धुळे पट्ट्यातील काही भागांना पावसाची प्रतीक्षा असतानाच आता विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी सांगण्यात आली आहे.
सध्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी असला तरीही तळकोकणात मात्र तो मुसळधार बरसत राहील असा अंदाज पुढील 24 तासांसाठी वर्तवण्यात आला आहे. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या दक्षिणेकडे कायम असून, त्याचा एक भाग पूर्वेकडे सरकत आहे. दरम्यान, सध्या विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, कोकणातील सिंधुदुर्ग पट्ट्याला पावसाचा तडाखा बसू शकतो असं सांगण्यात आलं आहे. थोडक्यात राज्याच्या काही भागांमध्ये हा पाऊस धडकी भरवेल, तर कुठे त्याची उघडीप सुरुच राहील.
13- 14 जुलैपासून कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे महासंचाक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.
13- 14 जुलैपासून कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आतील भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 10, 2023
IMD GFS Guidance pic.twitter.com/RfVLEz6Reh
पुढच्या 24 तासांसाठी राज्यातील वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या भागांना यलो अलर्ट असेल. तर, तिथे कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट असेल.
राज्यात पावसानं चांगलाच जोर धरलेला असताना आता अनेकांनीच पावसाळी सहलींचे बेत आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई - पुणे आणि नाशिकमधील अनेक ठिकाणांवर पर्यटकांची गर्दी आहे. तर, तिथे अलिबागच्या दिशेनं जाणाऱ्यांचा आकडाही कमी नाही.
सिंधुदुर्गातील (Sindhudurga) आंबोलीतही पर्यटकांची मोठी गर्दी उसळलीये. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी ओळख असणाऱ्या (Amboli Waterfall) आंबोलीच्या धबधब्यावर पर्यटक मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. इथं सांगली, कोल्हापूर, सातारा, गोव्यासह, कर्नाटकातील पर्यटकांचा मोठा आकडा पाहायला मिळत आहे.
तिथे माळशेज घाटातही (Malshej Ghat) चित्र वेगळं नाही. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुण्यातील माळशेज घाटात पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. माळशेजमध्ये येऊन हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर मात्र पोलिसांची करडी नजर असून, त्यांच्यावर कारवाईही केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.