Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

फोर्ब्सच्या यादीत शेतकऱ्याच्या मुलाचा डंका, लोणार ते लंडन...राजू केंद्रेची गगन भरारी

 बुलडाण्यातल्या पिंप्री खंदारे या छोट्याशा गावात शेतकऱ्याच्या पोटी राजू केंद्रे यांचा जन्म झाला. मात्र आज त्याचा डंका सातासमुद्रापार गाजतोय

फोर्ब्सच्या यादीत शेतकऱ्याच्या मुलाचा डंका,  लोणार ते लंडन...राजू केंद्रेची गगन भरारी

मयूर निकम, झी २४ तास, बुलडाणा : बुलडाण्यातल्या पिंप्री खंदारे या छोट्याशा गावात शेतकऱ्याच्या पोटी राजू केंद्रे यांचा जन्म झाला. मात्र आज त्याचा डंका सातासमुद्रापार गाजतोय. लोणारहून थेट लंडनपर्यंत... कारण फोर्ब्स इंडियाच्या २०२२ च्या 'फोर्ब्स थर्टी अंडर थर्टी' (Forbes 30 Under 30)यादीत त्याचं नाव झळकलं आहे.

राजू केंद्रे सध्या ब्रिटिश चिवनिंग स्कॉलरशीपवर लंडनमध्ये शिकतोय.  युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये भारतातील उच्च शिक्षण आणि असमानता या विषयावर तो संशोधन करतो. त्याचं दहावीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. शिक्षणाचा गंधही नसलेल्या त्याच्या कुटुंबातला तो पहिलाच पदवीधर आहे. 

'एकलव्य इंडिया'च्या माध्यमातून वंचित, गरीब घरातल्या मुलांना तो उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करतो. आतापर्यंत त्यानं ३०० हून अधिक वंचित विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मदत केली आहे. त्याच्या याच सामाजिक कार्याची दखल फोर्ब्स इंडियानं घेतली आहे.

राजू केंद्रेची लोणार ते लंडन प्रवासाची ही कहाणी तळागाळातल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशीच आहे.  शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला, खेड्यातल्या मातीत वाढलेला हा तरुण केवळ स्वतःची प्रगती करून थांबला नाही... तर आपल्यासारखे हजारो राजू निर्माण व्हावेत, यासाठी त्याची धडपड सुरू आहे.

Read More