Mumbai Girl Tops In Marathi: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालामध्ये महाराष्ट्रामधून मराठीत पहिली आलेली मुलगी ही एका रिक्षाचालकाची मुलगी आहे. मुंबईमधील घाटकोपर येथे असलेल्या झुनझुनवाला महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या गायत्री पन्हाळकरने मराठीमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. 87 टक्के गुण मिळवणारी गायत्री ही राज्यात मराठी विषयात पहिली आली आहे. लहानपणापासूनच गायत्रीवर मराठी भाषेचे संस्कार झाल्यानेच शालेय जीवनापासून तिने मराठीवर प्रभुत्व मिळवल्याचं तिचे शिक्षक सांगतात.
गायत्री घाटकोपरमध्ये राहते. रिक्षा चालवून वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. घरची परिस्थिती बेताची असतानाही गायत्रीने मन लावून अभ्यास करत 12 वीमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. गायत्रीला मराठी कथा, कवितांची विशेष आवड आहे. पाठ्यपुस्तकातील अभ्यासाबरोबरच मराठीमधील वेगवेगळ्या कविता, कथा आणि वृत्तपत्रांचं वाचन गायत्रीला फायद्याचं ठरलं. आई-वडिलांनीही गायत्रीला कायमच मराठीसंदर्भातील गोडी जोपासण्यात मदत केली. त्यामुळेच तिला मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळाले.
मराठी निबंध लेखणामध्ये गायत्रीचा हातखंडा आहे. मराठीबद्दल तिला लहानपणापासूनच विशेष आपुलकी वाटत असल्यानेच तिला हे यश मिळवता आलं, असं झुनझुनवाला महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख दीपा ठाणेकर म्हणाल्या. गायत्रीने मिळवलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाने तिचं विशेष कौतुक केलं आहे.
सरस्वती विद्यानिकेतन शाळेत माझंल प्राथमिक शिक्षण झालं. मला लहानपणापासूनच कवितांची विशेष आवड होती. वय वाढत गेलं तशी ती आवड वाढली. शाळेतल्या निबंध स्पर्धामधून मी भाग घेऊ लागले. त्यामुळे भाषेवर विशेष प्रभुत्व निर्माण झालं. वाणिज्य शाखेत शिकतानाही मी मराठीवरील प्रेमामुळे विशेष प्रयत्न करत ते प्रेम जोपासलं. याचमुळे मला मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळाले, असं गायत्रीने सांगितलं.
राज्यातून मराठीत पहिल्या आलेल्या गायत्रीला शुभेच्छा देण्यासाठी अनेक नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींनी मिठाईसहीत तिला घरी जाऊन गोड शुभेच्छा दिल्या.