Maharashtra Summer Travel Destinations : सुट्ट्यांचे दिवस सुरू झाले असून, अनेक मंडळींनी या दिवसांमध्ये राज्यांतर्गत प्रवासाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे. प्रवासावर जास्त वेळ खर्च न करता एखाद्या निवांत ठिकाणाला भेट देण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी महाराष्ट्रात दडलेलं हे ठिकाण म्हणजे एखाद्या खजिन्याहून कमी नाही.
पश्चिम महाराष्ट्रातील भौगोलिक रचना पाहता याच रचनेत हे ठिकाण जणू निसर्गानं एखादं रत्न योग्यरित्या तिथं ठेवावं त्याचप्रमाणं स्थिरावलं असून कैक वर्षांपासून इथं येणाऱ्या प्रत्येकाच्याच मनाचा ठाव घेत आहे. इथं प्रत्येक ऋतूनुसार रुपं बदलणारे डोंगर आहेत, घनदाट वनराई आहे, विस्तीर्ण तलाव आहे, हवेत गुलाबी थंडीची आणि वेळप्रसंगी बोचऱ्या थंडीची अनुभूती मिळते. किमान खर्चात प्रवासाचा आणि तिथल्या वातावरणाचा कमाल आनंद देणारं हे ठिकाण म्हणजे 'तापोळा', अर्थात महाराष्ट्रातलं काश्मीर.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात असणारं हे ठिकाण गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटकांमध्ये कमालीचं लोकप्रिय ठरलं असून, इथं पोहोचणंही तसं सोपं. फक्त उन्हाळाच नव्हे, तर पावसाळा आणि हिवाळ्यातही इथं येऊन या ठिकाणाचं सौंदर्य न्याहाळता येतं. जिथं सूर्याचा दाह अनेक ठिकाणी कहर करत असतो तिथंच तापोळा इथं येऊन मात्र एका कमाल वातावरणाचा अनुभव घेता येतो. पावसाळा आणि हिवाळ्यात तर इथला निसर्ग त्याच्या कैक लीला दाखवत पर्यटकांना गारद करतो.
मुंबईपासून हे ठिकाण 258.3 किमी अंतरावर असून, पुण्यापासून हे ठिकाण 146.4 किमी अंतरावर आहे. पाचगणीपासून हे ठिकाण 44 किमी, तर महाबळेश्वरपासून 28 किमी अंतरावर आहे. खासगी किंवा सरकारी वाहनानं अर्थात एसटीनंही इथं पोहोचता येतं.
तापोळ्यात येणाऱ्या प्रत्येकासाठीच इथं असणारा तापोळा तलाव हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असून इथं पर्यटकांना नौकानयनाचा आनंद घेता येतो. इथं असणाऱ्या जयगड आणि वासोटा या किल्ल्यांना भेट दिल्यानंतर इतिहासात डोकावण्याची संधी मिळते. तर, तापोळ्यानजीक असणारी अनेक ठिकाणं धकाधकीच्या जीवनापासून काहीशी उसंत मिळवून देणं सहज शक्य करतात. इको टुरिझम आणि कॅम्पिंग, ट्रेकिंग अशा अनेक प्रकारच्या भटकंतीतून तापोळा पर्यटकांना त्यांच्या प्राधान्यानुसार फिरता येतो. अशा या महाराष्ट्रातील मिनी काश्मीर किंवा काश्मीरला तुम्ही कधी भेट देताय?