Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'एक ऐवजी दोन चपटी प्या पण...', परिवहन मंत्र्यांसमोर ST कर्मचाऱ्यांना गोगावलेंचा अजब सल्ला

Bharat Gogawale On ST Driver Drink And Drive Case: एसटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये जाहीर भाषणात केलं हे विधान

'एक ऐवजी दोन चपटी प्या पण...', परिवहन मंत्र्यांसमोर ST कर्मचाऱ्यांना गोगावलेंचा अजब सल्ला

ST Bus Drink And Drive Case: राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एस.टी.च्या कामगार संघटनेचं 57 वं राज्यव्यापी अधिवेशन सोमवारी रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये पार पडलं. या अधिवेशनाला सरकारच्यावतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते.  एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत या अधिवेशनात विचार विनिमय झाला. शासनाने मागण्यांची दखल घेतली नाहीतर संपाचे हत्यार उपसण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला होता. त्यामुळे या अधिवेशनाकडे विशेष लक्ष लागून होतं.

व्यासपीठावर उपस्थित मंत्री एसटी कामगारांना काय आश्वासन देतात याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलं होतं. महिला कर्मचाऱ्यांना रात्री आठनंतर ड्युटी करावी लागणार नाही असं नियोजन करण्याचे आदेश परिवहनमंत्र्यांनी दिले. मात्र या अधिवेशनामध्ये मंत्री भरत गोगावलेंनी भाषणादरम्यान दिलेला एक विचित्र सल्ला चर्चेत आहे.

गोगावले नेमकं काय म्हणाले?

भरत गोगावलेंनी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना मद्यपानासंदर्भात एक विचित्र विधान केलं. एसटी चालकांकडून मद्यपान केल्याने अपघात होत असल्याचा संदर्भ देत गोगावलेंनी, "एक ऐवजी दोन चपटी प्या पण ड्युटी संपल्यावर," असं विधान भाषणात केलं. "एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्या रास्त असतात. एकनाथ शिंदे यांनी वेतनवाढ दिली. पण अजून काही सुविधा मिळाल्या पाहिजेत," असं म्हणत गोगावलेंनी आपण कर्मचाऱ्याच्या पाठीशी असल्याचं म्हटलं.

एसटी कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अपघातांबद्दल बोलताना गोगावलेंनी, "तुमच्याकडून अपघात होतात. कुणी जाणून बुजून करत नाही. मोबाईल आणि नशापन करून अपघात होतात. ड्युटी संपल्यावर एक चपटीऐवजी दोन प्या," असा सल्ला एसटी कर्मचाऱ्यांना दिला.

परिवहन मंत्र्यांची महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या भाषणामध्ये एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना रात्रीची ड्युटी नसणार अशी घोषणा केली. "महिला कर्मचाऱ्यांना रात्रीची ड्यूटी नसणार. रात्री 8 वाजेपर्यंत त्यांच्या ड्युटी कशी संपेल हे पहावे," अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महिला कर्मचाऱ्यांनी या बाबत परिवहन मंत्री सरनाईक यांना निवेदन दिलं होतं. त्याचा उल्लेख करत सरनाईक यांनी एसटीचे उपाध्यक्ष माधव कुसेकर यांना या बाबत जाहिररित्या सूचना केल्या.

कर्मचाऱ्यांनी नोंदवल्या या तक्रारी

कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये, "परिवहन मंत्र्यांनी स्वतःच्या लालपरी घेण्याचा निर्णय घेतला. एसटी नफ्यात नाही. जर आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके वेतन दिले तर आमचा कर्मचारी सांगेल हे सरकार चांगलं आहे, त्यालाच निवडून द्या. काही दिवसापूर्वी 2 दिवसांचा संप झाला. आम्हाला राजकारण करायचं नाही. उदय सामंत हे आपले वकील आहेत. ते आपले उज्वल निकम आहेत. या मंडपातून परत जाताना आमच्या चेहऱ्यावर हसू येईल अशी घोषणा करा," अशी विनंती परिवहन मंत्र्यांकडे केली.

"आमचं राज्य सरकार एवढं वेतन करा.  आरटीओवाले दंड करतात. ते थांबवा. काही अधिकारी कर्मचाऱ्यांशी नीट बोलत नाहीत. कर्मचाऱ्यांवर किरकोळ कारणावरून निलंबनाची कारवाई होते," अशा तक्रारही शिंदेंनी मांडल्या.

Read More