जयेश जगड, झी मीडिया, अकोला : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरल महाराष्ट्रानं विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली असून, कृषी क्षेत्रसुद्धा यात मागे नाही. अशा या महाराष्ट्राच्याच विदर्भातील एका जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळाला आहे. हा बहुमान मिळाला आहे तो म्हणजे पांढळ्या सोन्यामुळं.
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालं असून, अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. कापूस प्रक्रिया उद्योगासाठी अकोल्याला हे राष्ट्रीय दर्जाचं पारितोषिक मिळालं आहे.
‘एक जिल्हा एक उत्पादन 2024' अंतर्गत महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी केली असून राज्याला ' अ ' श्रेणीतील सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. अकोला जिल्ह्याला कापूस प्रक्रिया उद्योग विकासासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पारितोषिक देण्यात आले. महाराष्ट्रातील रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि अकृषी क्षेत्रातील आपल्या विशेष उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कार पटकावले.
महाराष्ट्राने आपल्या उत्पादनांच्या नाविन्यपूर्णतेसह, उच्च दर्जाने आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेने राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. अकोला जिल्ह्याला जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला.
अकोल्यात सुमारे 100 जीनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी असून 4 सूतगिरण्या आहे. कापूस उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रातील अकोल्याची प्रगती आणि औद्योगिक विकास यामुळे हा पुरस्कार अकोल्याला मिळाला आहे. यामुळे आता कापड उद्योगाला चांगली चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.
या पुरस्कारासाठी देशभरातील 577 जिल्ह्यांनी नामांकन दिले होते. मात्र अकृषी क्षेत्रात पुरस्कार मिळवणारा अकोला हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. अकोल्याला मिळालेल्या या बहुमानामुळे कापूस ते कपडा निर्मितीपर्यंतचा उद्योग करणाऱ्या या एकमेव उद्योगाला भविष्यात निर्यातीच्या संधीही उपलब्ध होणार असल्याचा आनंद कापड उद्योजकांकडून व्यक्त केला जात आहे.
केंद्र शासनातर्फे अकोला जिल्ह्याला जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाल्यामुळे येथील कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहे. ज्यामुळं आता जागतिक स्तरावर ही ओळख कशी मोठी करता येईल यावरच अधिक प्रयत्न आणि त्या धर्तीवरील काम केलं जाणाची चिन्हं पाहायला मिळत आहेत.