Maharashtra Weather News : काही दिवसांपूर्वी देशातील बहुतांश भागांवर एकाएकी पावसाचं सावट पाहायला मिळालं. ज्यानंतर आता या परिस्थितीत सुधारणा होणार असून, हे पावसाचे ढग दूर झाले आणि पुन्हा एकदा कडाक्याच्या उन्हानं महाराष्ट्राला होरपळवण्यास सुरुवात केली. तिथं देशाच्या उत्तरेकडेसुद्धा हवामान बदलांचं सत्र अतिशय वेगानं सुरू झालं असून, इराणमार्गे एक नवा पश्चिमी झंझावात हिमालयाच्या पश्चिमेच्या दिशेनं पुढे सरसावताना दिसत आहे. परिणामी पर्वतीय भागांमध्ये क्षणोक्षणी हवामान बदलताना दिसत आहे.
पश्चिमी झंझावाताचे थेट परिणाम पुढील काही दिवस हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड इथं दिसणार असून, दिल्ली, पंजाब, हरियाणा इथंही ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल असा इशारा जारी करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तापमानात किमान 2 ते 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वादळी पावसाचे ढग माघार घेत असतानाच महाराष्ट्रात उन्हाचा दाह पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात वातावरण अंशत: ढगाळ असेल आणि उष्मा मात्र वाढताना दिसेल. तर, विदर्भापासून तामिळनाडूच्या दक्षिणेपर्यंत मात्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्या कारणानं बंगालच्या उपसागरात अँटी सायक्लोन स्थिती पाहायला मिळत आहे. ज्यामुळं पूर्वोत्तर राज्यांमध्ये याचे परिणाम दिसून येत आहेत. हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात पुढील 24 तासांमध्ये विदर्भात पुन्हा एकदा उष्मा वाढणार असून, मध्य महाराष्ट्रातही उष्णतेचा तडाखा बसण्यास सुरुवात होणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्येसुद्धा तापमानवाढीस सुरुवात होणार असून, दुपारच्या वेळी नागरिकांची सर्वाधिक होरपळ होणार आहे. ज्या कारणानं ऐन दुपारी उन्हाचा तडाखा अधिक तीव्र असताना नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडावं असाच इशारा देण्यात येत आहे.
पुणे - 36.6/ 17.2
जळगाव - 37.7/ 17.0
कोल्हापूर- 37.1/ 21.0
निफाड- 35.7/12.0
सातारा- 36.7/ 18.4
रत्नागिरी- 33.0/ 21.6
मुंबई- 34.6/ 26.0
आयएमडीच्या वृत्तानुसार पश्चिमी झंझावातामुळं अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, तेलंगणा, कर्नाटक इथं पावसाची हजेरी असेल. तर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांत गिलगिट, बाल्टीस्तान, लडाख, जम्मू काश्मीरचं खोरं इथं बर्फवृष्टीला सुरुवात होणार असून, जनजीवनावर याचा परिणाम होण्याचा इशारा देण्यात आला आहे.