मे महिन्यात कसं असेल हवामान?
मे महिन्यात कसं असेल हवामान?
Maharashtra Weather News : मागील 24 तासांसाठीच्या हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळीचं सावट पाहायला मिळालं तर, मुंबई, ठाणे, रायगडसह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उकाडा प्रचंड वाढताना दिसला. देश स्तरावरही हवामानात मोठे बदल होत असून, खासगी हवामान संस्था स्कायमेटनं उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रांमध्ये सध्याची स्थिती कायम राहणार असून तापमानात फारसे चढ- उतार अपेक्षित नसल्याचं सांगितलं.
1 मेनंतर देशभरात वादळी वातावरणास सुरुवात होणार असून पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमध्ये मान्सूनपूर्व वातावरणनिर्मितीस सुरुवात होईल आणि धीम्या गतीनं शेजारी राज्यांमध्येही याचे परिणाम दिसून येतील. संपूर्ण उत्तर भारतामध्ये पुढील 48 तासांनंतर मान्सूनपूर्व वातावरणामध्येच पावसाच्या सरींची बरसात अपेक्षित आहे.
मध्य प्रदेशात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळं विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत दक्षिणोत्तव वाऱ्यांचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळं उन्हाचा चटका तुलनेनं कमी होताना दिसत आहे. असं असलं तरीही मराठवाडा मात्र इथं अपवाद ठरत असून, इथं मात्र तापमानात फारसा फरक पडलेला दिसत नाही.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामानामुळं पुढचे 24 तास नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागेल. पूर्व विदर्भात मात्र वादळी पावसाचा इशारा कायम असून, इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुढचे 72 तास उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता असून सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान घराबाहेर जाणं टाळा असा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे. राज्यात दक्षिण-पूर्वेकडील जिल्हे पावसाची नसून पुण्यासह उर्वरित भागात कोरडं उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. आता थेट 3 मेनंतर राज्यात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होईल आणि मे महिन्याच्या मध्यानंतर मान्सूनपूर्व स्थिती निर्माण होण्यास सुरुवात होईल.
मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये वादळी हवामानाच्या विस्तार आणि वाधीसाठी अनेक घटक एकत्र येत असून, 1 मे च्या रात्रीपासूनच नव्यानं एक पश्चिमी झंझावात सक्रिय होत आहे. राजस्थान आणि पंजाबमध्ये चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. तर देशाच्या दक्षिणेकडे पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असून, त्यामुळं या महिन्यात वादळी हवामानाची स्थिती कायमच असेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.